विशाल शिंदे

भोर : गाऊडदरा (ता. हवेली) येथे शेतजमिनीच्या हद्दीवरून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. या प्रकरणात दोन्ही बाजूंकडून राजगड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या तक्रारीनुसार, सागर अनिल ओव्हाळ (वय ३७, व्यवसाय पोल्ट्री उद्योग, सध्या रा. हडपसर, पुणे, मूळ रा. गाऊडदरा) यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता गाऊडदरा गावच्या हद्दीत उत्तम ओव्हाळ यांच्या घरासमोर शेतजमिनीच्या मोजणीवरून वाद झाला.

सागर ओव्हाळ यांनी संबंधितांना शेतजमिनीची मोजणी करून घेण्यास सांगितले. ‘मला तुमची एक फूटही जागा नको आणि तुम्हीही माझी एक फूट जागा घेऊ नका,’ असे सांगितल्यावर सुमित ओव्हाळ व छाया ओव्हाळ यांनी शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
त्यानंतर उत्तम ओव्हाळ यांनी हातातील लाकडी काठीने डोक्यात मारल्याने आपण खाली पडलो. त्यानंतर सुमित ओव्हाळ यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच उत्तम ओव्हाळ यांनी कोयत्यासारख्या हत्याराने उजव्या हाताच्या अंगठ्याच्या आतील बाजूस दुखापत केल्याचा आरोप सागर ओव्हाळ यांनी तक्रारीत केला आहे. या प्रकरणी उत्तम पांडुरंग ओव्हाळ, सुमित उत्तम ओव्हाळ आणि छाया उत्तम ओव्हाळ यांच्याविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या बाजूनेही तक्रार
दरम्यान, याच घटनेप्रकरणी सुमित उत्तम ओव्हाळ (वय ३६, व्यवसाय शिक्षण व शेती, रा. बौद्ध वस्ती, गाऊडदरा) यांनीही राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
सुमित ओव्हाळ यांच्या तक्रारीनुसार, १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजता त्यांच्या राहत्या घरासमोर सागर ओव्हाळ यांच्याशी जागेच्या कारणावरून वाद झाला. ‘ही जागा आमची आहे, सातबारा आमच्या नावावर आहे. या जागेतून ये-जा करायची नाही,’ असे म्हणत सागर ओव्हाळ यांनी शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
त्यानंतर सागर ओव्हाळ यांनी हातातील लाकडी काठीने उजव्या हाताच्या मधल्या बोटावर मारून दुखापत केल्याचे सुमित ओव्हाळ यांनी तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून सागर अनिल ओव्हाळ यांच्याविरुद्धही विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जमिनीच्या हद्दीवरून सुरू झालेल्या वादात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर मारहाणीचे आरोप केल्याने या प्रकरणाला परस्परविरोधी तक्रारींचे स्वरूप आले आहे. दोन्ही तक्रारींमधील आरोपांची सत्यता, वादाची नेमकी पार्श्वभूमी आणि झालेल्या दुखापतींबाबत राजगड पोलिसांकडून तपास सुरू आहे.
पहिल्या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार मुंढे करीत असून, दुसऱ्या तक्रारीचा तपास पोलीस हवालदार प्रधान करीत आहेत. प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.






