सागर जगदाळे

भिगवण: मच्छीमारांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघर्ष कृती समितीने पुकारलेल्या बंदला भिगवणमध्ये जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूरच्या उपबाजार भिगवण येथे आज सकाळपासूनच मच्छी विक्री पूर्णपणे बंद राहिल्याने नेहमी गजबजणाऱ्या मच्छी मार्केटमध्ये अक्षरशः शुकशुकाट पाहायला मिळाला. भिगवणच्या मच्छी बाजारात दररोज साधारण ५० ते ७० लाख रुपयांची उलाढाल होत असल्याचे सांगितले जाते. मात्र, आज एकही मच्छीमार मासे विक्रीसाठी बाजारात दाखल झाला नसल्याने ही संपूर्ण उलाढाल ठप्प झाली. परिणामी मच्छी विक्रीवर अवलंबून असलेले व्यापारी, वाहतूकदार, हमाल यांच्यासह हॉटेल व्यावसायिकांनाही मोठा आर्थिक फटका बसला आहे.

मच्छी खवय्यांचा हिरमोड; रिकाम्या हाती परतण्याची वेळ

दरम्यान, भिगवणच्या मच्छी मार्केटमध्ये नेहमीप्रमाणे मासे मिळतील, या अपेक्षेने अनेक मच्छी खवय्ये सकाळपासून मासे खरेदी करण्यासाठी बाजारात आले होते. मात्र, बाजार बंद असल्याचे समजल्यानंतर त्यांना मासे न घेताच रिकाम्या हाती परतावे लागले.
मासे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्टपणे जाणवत होती. विशेषतः मच्छी खरेदीवर अवलंबून असलेल्या हॉटेल व्यावसायिकांचीही मोठी गैरसोय झाली असून, मच्छी उपलब्ध नसल्याने त्यांच्या व्यवसायावर थेट परिणाम झाला आहे.
मच्छीमारांचा सरकारला थेट इशारा!
उज्जनी धरणाच्या पाण्यावर प्रस्तावित असलेला तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करावा, तसेच मासेमारीशी संबंधित ई-ट्रेडिंग चाचपणीसाठी प्रस्तावित मासेमारीचा खासगी ठेका तात्काळ रद्द करावा, या प्रमुख मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आला आहे.
११, १२ आणि १३ ऑगस्ट २०२६ रोजी मासेमारी आणि मच्छी मार्केट बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच १२ ऑगस्ट रोजी सोलापूर येथील सिंचन भवन येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मच्छीमारांचा हा लढा केवळ मासेमारीपुरता नसून उपजीविका, व्यवसाय आणि पुढील पिढीच्या भवितव्याचा प्रश्न असल्याची भूमिका मच्छीमार संघर्ष कृती समितीने घेतली आहे.
“आमच्या मागण्या सरकारला मान्य कराव्याच लागतील; अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल,” असा थेट इशारा समितीच्या वतीने देण्यात आला आहे. एकीकडे बाजारपेठेतील लाखोंची उलाढाल ठप्प, दुसरीकडे हॉटेल व्यावसायिक आणि मच्छी खवय्यांची गैरसोय, भिगवणमधील या कडकडीत बंदमुळे मच्छी व्यवसायाशी जोडलेल्या संपूर्ण साखळीवरच परिणाम झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नेहमी ग्राहकांच्या वर्दळीने गजबजणाऱ्या परिसरात सकाळपासूनच तुलनेने शांतता आणि कमी वर्दळ जाणवत होती. त्यामुळे मच्छी मार्केटशी थेट किंवा अप्रत्यक्षपणे जोडलेल्या अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांवर बंदचा परिणाम झाला.
मच्छी खवय्यांचा हिरमोड
दरम्यान, मच्छी मार्केट सुरू असेल या अपेक्षेने अनेक मच्छी खवय्ये सकाळपासून मासे खरेदी करण्यासाठी बाजारात आले होते. मात्र बाजार बंद असल्याने त्यांना रिकाम्या हाती परतावे लागले. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्टपणे जाणवत होती.
मासे उपलब्ध नसल्याने मच्छीवर आधारित पदार्थ देणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांनाही आर्थिक फटका बसला आहे.
मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
उजनी धरणावर प्रस्तावित तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करावा, तसेच मासेमारीशी संबंधित ई-ट्रेडिंग चाचपणीसाठी प्रस्तावित मासेमारीचा खासगी ठेका तात्काळ रद्द करावा, या प्रमुख मागण्यांसाठी मच्छीमारांनी आंदोलन पुकारले आहे. १२ ऑगस्ट रोजी सोलापूर येथील सिंचन भवन येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले असून, सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा मच्छीमार संघर्ष कृती समितीने दिला आहे. मच्छीमारांच्या एका दिवसाच्या बंदमुळे लाखोंची उलाढाल थांबण्यासोबतच भिगवणच्या बाजारपेठेतील ग्राहकांची वर्दळ आणि पूरक व्यवसायांवरही परिणाम झाला. त्यामुळे हा बंद केवळ एका व्यवसायाचा प्रश्न न राहता स्थानिक बाजारपेठेच्या अर्थचक्रावर परिणाम करणारा ठरला आहे.







