बारामती: बारामती तालुक्यातील फोंडवाडा गावातील एका तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी त्याच्या बहिणीने गंभीर आरोप केले आहेत. कौटुंबिक मालमत्तेच्या वादातून नातेवाईकांनीच आपल्या भावाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप धनश्री पिसाळ यांनी केला आहे. भावाला न्याय मिळवून देण्यासाठी धनश्री यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील नोकरी सोडून बारामती गाठली आहे.

पत्रकार परिषदेत धनश्री पिसाळ यांनी या प्रकरणातील तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांच्या भावाने व्हिडिओ रेकॉर्डिंग केले होते, तसेच सुसाईड नोटही लिहून ठेवली होती. मात्र, या महत्त्वाच्या पुराव्यांचा तपासात समावेश का करण्यात आला नाही, ते पुरावे समोर का आणले जात नाहीत, असा सवाल त्यांनी केला.

हे प्रकरण केवळ कौटुंबिक मालमत्तेच्या वादापुरते मर्यादित नसून मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचाही आरोप धनश्री यांनी केला आहे. त्यांच्या नावाने बनावट बँक खाते उघडून त्यामधून सुमारे ३२ लाख रुपयांची आर्थिक उलाढाल करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. तसेच संपूर्ण पिसाळ कुटुंबाच्या सुमारे ४ ते ५ कोटी रुपयांच्या संपत्ती आणि जमिनीचा नातेवाईकांनी गैरव्यवहार केल्याचा आरोपही त्यांनी केला.

भावाला न्याय मिळवून देण्यासाठी चांगल्या पगाराची नोकरी सोडून बारामतीत आलेल्या धनश्री यांनी गृह खात्याकडे या प्रकरणाची तातडीने दखल घेण्याची मागणी केली. दोषींवर कारवाई करून आरोपींना अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, पोलिसांनी निष्पक्ष तपास करून आरोपींना तातडीने अटक केली नाही, तर कुटुंबासमोर आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही, असा गंभीर इशारा धनश्री पिसाळ यांनी दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले असून, पोलिस प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे.







