अहिल्यानगर : पोलीस दलात भरती होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या २५ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आळेफाटा येथे घडली. भाग्यश्री भास्कर भंडारी असे मृत तरुणीचे नाव असून ती पारनेर तालुक्यातील आळकुटी येथील रहिवासी होती. अकॅडमी शिक्षकाकडून मानसिक त्रास दिला जात असल्याच्या आरोपावरून मयुर अशोक डुंबरे (रा. खामुंडी, ता. जुन्नर) याच्याविरुद्ध आळेफाटा पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाग्यश्री पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी आळेफाटा येथे राहत होती. कुटुंबाच्या अपेक्षा आणि पोलीस दलात जाण्याचे ध्येय समोर ठेवून ती मेहनत घेत होती. मात्र, काही दिवसांपासून अकॅडमीतील शिक्षक मयुर डुंबरे याच्याकडून तिला वर्गात तसेच इतर विद्यार्थ्यांसमोर अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे ती मानसिक तणावात होती, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

यापूर्वीच्या एका घटनेच्या पार्श्वभूमीवर डुंबरे याला पोलीस ठाण्यात जावे लागले होते. त्याच घटनेचा राग मनात धरून भाग्यश्रीला त्रास दिला जात असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून भाग्यश्रीने राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

भाग्यश्रीची बहीण शितल भंडारी यांनी या प्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे. भाग्यश्रीच्या मृत्यूमागील नेमके कारण काय होते, तिला कोणत्या स्वरूपाचा त्रास सहन करावा लागला आणि त्यासाठी नेमकी कोणती परिस्थिती कारणीभूत ठरली, याचा तपास आळेफाटा पोलीस करत आहेत.
या घटनेनंतर खासगी प्रशिक्षण अकॅडमींमधील विद्यार्थ्यांवरील मानसिक दबाव आणि त्यांच्या वर्तणुकीबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देताना त्यांच्याशी योग्य पद्धतीने वागले जाते का, याची प्रशासनाने तपासणी करावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.







