पुणे : लग्नाचे खोटे आमिष दाखवून पुण्यातील एका 40 वर्षीय महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिलेची फसवणूक करणे, तिच्यावर अत्याचार करणे आणि नंतर अश्लील व्हिडिओच्या आधारे तब्बल 25 लाख रुपयांची खंडणी मागणे, या गंभीर प्रकरणात काळेवाडी पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या घटनेतील आरोपी अभिमन्यू संजय भोर (वय 30, मूळ केडगाव, अहिल्यानगर; सध्या रा. कोथरूड, पुणे) याच्याविरुद्ध पोलिसांनी पिंपरी-चिंचवड न्यायालयात भक्कम दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी आरोपी अभिमन्यूने या पीडित महिलेशी जवळीक साधून तिचा विश्वास संपादन केला होता. आरोपीने लग्न करण्याचे आमिष दाखवून महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. मात्र, त्याचा मूळ हेतू फसवणूक करण्याचाच होता. लग्न न करताच त्याने महिलेसोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.यादरम्यान आरोपीने महिलेचे काही अत्यंत वैयक्तिक आणि अश्लील फोटो व व्हिडिओ स्वतःच्या मोबाईलमध्ये चोरून शूट केले.

काही काळानंतर आरोपीने आपला खरा चेहरा दाखवत महिलेला धमकावण्यास सुरुवात केली. “मला 25 लाख रुपये दिले नाहीस, तर हे अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेन,” अशी धमकी तो देऊ लागला. आरोपीच्या या सततच्या ब्लॅकमेलिंग आणि मानसिक त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेने काळेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आणि प्रकरणाचा वेगाने तपास केला. आरोपीने केलेला विश्वासघात, लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेलिंगचे भक्कम पुरावे गोळा करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहे. त्यामुळे आता आरोपी अभिमन्यू भोर याला न्यायालयीन प्रक्रियेद्वारे कडक शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे.







