फुरसुंगी, ता. १५ : फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी तरुणांकडून गोळीबाराचा सराव केला जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अखेर संबंधित दोन तरुणांना गावठी पिस्टल आणि मॅगझीनसह जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.

आदेश आत्माराम काळे (वय २०, रा. काळेवाडी, ता. पुरंदर) आणि अजय बाळासाहेब साबळे (वय ३०, रा. साबळे मळा, वडकीनाला, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार हेमंत शरदचंद्र कामठे यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठांच्या आदेशानुसार फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाकडून अवैध धंदे, फरार आरोपी, तडीपार गुन्हेगार तसेच बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत होती. दरम्यान, १३ जून रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास वडकीनाला येथील पालखी विसावा परिसरात पेट्रोलिंग सुरू असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. दिवेघाट पायथा परिसरातील महालक्ष्मी डेव्हलपर्स प्लॉटिंगजवळील मोकळ्या जागेत दोन संशयित इसम थांबले असून त्यापैकी एकाकडे गावठी पिस्टल असल्याची माहिती बातमीदाराने दिली.
ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांना देण्यात आली. त्यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक बापुसाहेब खंदारे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने पंचांसह घटनास्थळी सापळा रचला. पोलिसांना पाहताच संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाठलाग करून दोघांनाही ताब्यात घेण्यात आले.
पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीदरम्यान आदेश काळे याच्या ट्रॅक पँटमध्ये मॅगझीनसह एक गावठी पिस्टल आढळून आले. संबंधित शस्त्र बाळगण्याचा कोणताही परवाना त्याच्याकडे नव्हता. चौकशीत हे पिस्टल अजय साबळे याचे असून ते परत करण्यासाठी आपण आलो असल्याची माहिती आदेश काळे याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी सुमारे ४० हजार रुपये किमतीचे गावठी पिस्टल आणि मॅगझीन जप्त करून पंचांसमक्ष सीलबंद केले. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३(५), शस्त्र कायदा कलम ३ व २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक बापुसाहेब खंदारे, पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक कदम, पोलीस हवालदार गायकवाड, जाधव, वणवे, काळे आदींच्या पथकाने केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बापुसाहेब खंदारे करीत आहेत.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या गोळीबाराच्या व्हिडिओनंतर निर्माण झालेली भीती लक्षात घेता फुरसुंगी पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधितांना अटक केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.







