राहुलकुमार अवचट

यवत: संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या केडगाव येथील बेकायदेशीर लिंग निदान करणाऱ्या टोळीतील मुख्य सूत्रधाराची जवळची मदतनीस सदिच्छा शिंदे हिला यवत पोलिसांकडून अटक आली असून लिंग निदानाचे पैशांचे व्यवहार आरोपी सदिच्छा शिंदे हिच्या बँक खात्यावर होत असल्याचा तपासात खुलासा झाला आहे.

पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या विशेष तपास पथकाने (SIT) आणि यवत पोलीस ठाण्याने सामाजिक स्वास्थ्याला घातक ठरणारे बेकायदेशीर लिंग निदान व स्त्री-भ्रूणहत्येचे रॅकेट समूळ नष्ट करण्यासाठी धडक कारवाई सुरू ठेवली आहे. या खळबळजनक गुन्ह्याच्या सखोल तपासादरम्यान गुन्ह्यातील मुख्य सूत्रधाराची जवळची मदतनीस असलेली आरोपी सदिच्छा दिलीप शिंदे उर्फ सदिच्छा लक्ष्मण भोसले (वय २३ वर्षे) हिला यवत पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने अटक केली आहे.
या गुन्ह्यात पूर्वी अटक करण्यात आलेली मुख्य आरोपी डॉ. संगीता गायकवाड हिच्या पोलीस कोठडीतील सखोल तपासादरम्यान धक्कादायक माहिती निष्पन्न झाली असून अटक आरोपी सदिच्छा शिंदे ही या रॅकेटमधील मुख्य दुवा व मुख्य सूत्रधाराची जवळची मदतनीस असून, ती तोतया (बोगस) डॉक्टर अण्णासाहेब गिरी याच्यासोबत थेट संपर्कात होती. सदिच्छा शिंदे ही गरोदर महिलांच्या घरी, तसेच मुख्य आरोपीच्या शिंदवणी येथील फार्म हाऊसवर आणि सिताई हाके नगर येथील फ्लॅटवर गरोदर महिलांना आणून, पोर्टेबल सोनोग्राफी मशीनद्वारे बेकायदेशीररित्या गर्भलिंग निदान करण्याच्या गुन्ह्यात थेट सहभागी असायची विशेष म्हणजे, या बेकायदेशीर कृत्यातून मिळणारी मोठी रक्कम (गुन्ह्यातील लाभाचे पैसे) ही आरोपी सदिच्छा शिंदे हिच्या बँक खात्यावर घेतली जात असल्याचे तपासात उघड झाले आहे.
त्यानंतर गरोदर महिलेच्या गर्भातील अर्भक हे स्त्री जातीचे (मुलगी) असल्याचे निष्पन्न झाल्यावर, संबंधित महिलांना केडगाव येथील ‘पार्थ हॉस्पिटल’ मध्ये बेकायदेशीर गर्भपातासाठी (स्त्री-भ्रूणहत्या करण्यासाठी) पाठवले जात होते. रुग्णालयात गर्भपात केला जात असताना देखील आरोपी सदिच्छा शिंदे तिथे प्रत्यक्ष हजर असायची, असे निष्पन्न झाले आहे.
सदर गुन्ह्याचे सामाजिक व कायदेशीर गांभीर्य अत्यंत तीव्र असल्याने तपासातील निष्पन्न पुराव्यांच्या आधारे गुन्ह्यामध्ये कठोर कायदेशीर कलमांचा समावेश करण्यात आला असून सध्या या गुन्ह्यामध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ९१, ३(५), ८८ सह गर्भधारणा पूर्व आणि प्रसव पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवड प्रतिबंध) कायदा (PCPNDT Act) कलम ६(ब), ६(क), १८, २३, २५ आणि वैद्यकीय गर्भपात अधिनियम (MTP Act) १९७१ चे कलम ३, ४ अन्वये गुन्हा दाखल आहे. गुन्ह्यातील आर्थिक पाळेमुळे शोधण्यासाठी आरोपींच्या बँक खात्यांची माहिती घेऊन ती ‘डेबिट फ्रीज’ करण्याची कायदेशीर प्रक्रिया पोलिसांमार्फत समांतर सुरू आहे.
सदरची कारवाई ही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार , आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक राजेंद्र मायने, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापूसाहेब दडस यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्या यवत पोलिस पथक व विशेष तपास पथकाने (SIT) यांनी केली.
पुणे ग्रामीण पोलिसांचा गंभीर इशारा; गुन्ह्यात सहभागी असलेल्या कोणाचीही गय केली जाणार नाही
महाराष्ट्र पोलीस आणि पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस प्रशासन या गुन्ह्याचा अत्यंत गंभीरपणे आणि शास्त्रीय पुराव्यांच्या आधारे तपास करत असून स्त्री-भ्रूणहत्या आणि बेकायदेशीर लिंग निदान हा मानवतेला काळीमा फासणारा गंभीर अपराध आहे. या रॅकेटमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सहभागी असलेल्या किंवा त्यांना पाठीशी घालणाऱ्या कोणत्याही घटकाला, मग तो कितीही वजनदार असले, तरी सोडले जाणार नाही व त्यांच्यावर कठोरतम कायदेशीर कारवाई केली जाईल.”
– संतोष तासगावकर (तपासणी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक, यवत पोलीस ठाणे)






