पुणे : वाकड परिसरातील डांगे चौक रस्त्यावर असलेल्या एका बिर्याणी हाऊसमध्ये रविवारी रात्री अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. गॅस सिलिंडर बदलण्याचे काम सुरू असताना गॅस गळती झाल्याने आगीचा मोठा भडका उडाला. या दुर्घटनेत एका 19 वर्षीय तरुण कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अन्य दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

वाकड येथील सुखवानी सिटी संकुलात ‘नवी दिल्ली 6 बिर्याणी हाऊस’ नावाचे हॉटेल आहे. रविवारी रात्री हॉटेलमधील गॅस सिलिंडर संपल्याने नवीन सिलिंडर बसवण्याचे काम सुरू होते. मात्र, त्याच वेळी हॉटेलमधील मुख्य भट्टी सुरू होती. सिलिंडर जोडताना अचानक गॅस बाहेर पडला आणि तो भट्टीच्या संपर्कात येताच काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले.

आगीचा भडका उडताच सिलिंडर बदलणाऱ्या कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखत तातडीने बाहेर धाव घेतली. मात्र, त्यावेळी हॉटेलमध्ये काम करत असलेला शेहजाद शेख हा तरुण आगीच्या लपेट्यात अडकला. धुरामुळे त्याचा श्वास गुदमरला आणि तो गंभीर भाजला गेला. त्याला तातडीने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलीस तपासात समोर आले आहे की, हॉटेलचे मालक मोहम्मद उस्मान (वय 38, रा. तळेगाव, मूळ फरिदाबाद) यांनी हॉटेल चालवण्याची जबाबदारी फरहान आणि त्याचा भाऊ शेहजाद शेख यांच्याकडे दिली होती.
घटनेची माहिती मिळताच थेरगाव आणि रहाटणी अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. तीन अग्निशामक बंबांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या प्रकरणी वाकड पोलीस पुढील तपास करत असून कायदेशीर कारवाई सुरू आहे.







