आदित्य बोराटे

इंदापूर: इंदापूर तालुक्यात सुरू असलेल्या वारंवारच्या लोडशेडिंगमुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले असून, पिकांना वेळेवर पाणी देता येत नसल्याने शेतीचे मोठे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी (दि.२९) जून दुपारी ३ वाजता बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी दिली.

शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने या प्रश्नाकडे लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून लोडशेडिंग कमी करणे, कृषी पंपांना नियमित वीजपुरवठा उपलब्ध करून देणे आणि शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर उपाययोजना करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे.
शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने आयोजित या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी केले आहे.







