लोणी काळभोर , ता. 7: वाहनांच्या नंबरप्लेटवर पोलीस, पत्रकार, व्हीआयपीसह दादा, नाना, काका अशी नावे लिहिणे कायद्याने गुन्हा आहे. त्यातच आता शासनाने वाहनांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांवर उच्च-सुरक्षा नोंदणी प्लेट (HSRP) लावणे बंधनकारक केले आहे. असे असतानादेखील काही नागरिक कायद्याला न जुमानता वाहनांच्या नंबर प्लेटवर फॅन्सी नंबर प्लेट लावत आहेत. असाच एक प्रकार कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाका परिसरात सोमवारी (ता.6) उघडकीस आला आहे.

पुणे-सोलापूर महामार्गावर एक दुचाकी वारंवार फिरत असून तिच्या पुढच्या नंबरप्लेटवर पोलीस लिहिले आहे. मात्र हा दुचाकीचालक पोलीस नसून तो जगताप नामक पोलिसाची दुचाकी चालवीत असल्याची माहिती मिळत आहे. हा दुचाकीचालक वाहतुकीचे नियम पायदळी तुडवून गाडी चालवीत आहे. कायद्याचे रक्षकच नियम पायदळी तुडवीत असतील तर सर्वसामान्य नागरिकांनी पाळायचे कसे? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

महाराष्ट्र शासन गृह विभागाने खासगी दुचाकी चारचाकी वाहनांवर अशाप्रकारे लोगो अथवा नाव वापरल्यास त्यांच्यावर सक्त कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. शासकीय वाहनांच्या व्यतिरिक्त वाहनधारक कोणत्याही खाजगी वाहनांवर महाराष्ट्र शासन, भारत सरकार, भारताची राजमुद्रा, सैन्यातील विविध चिन्हांची प्रतिकृती, आणि पोलीस असे नाव लिहू शकत नाही. किंवा पोलिसांचे बोधचिन्ह अथवा पाट्या लावू शकत नाही. असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. मात्र न्यायालयाच्या आदेशाचे काही नागरिक राजरोसपणे उल्लंघन करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा वाहनांवर कडक कारवाई करावी. अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

दरम्यान, भारतामध्ये वाहनांची सुरक्षा वाढवणे, वाहन चोरी रोखणे आणि फसवणूक टाळणे या उद्देशाने उच्च-सुरक्षा नोंदणी प्लेट (HSRP) सुरू करण्यात आली आहे. या प्लेटमध्ये लेसर-कोरीव अनुक्रमांक, RFID चिप आणि स्नॅप-लॉक डिझाइन यांसारखी सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. ज्यामुळे त्या बनावट करणे अत्यंत कठीण आहे. परंतु, काही महाभाग वाहतुकीच्या नियमांचे पालन करताना दिसून येत नाहीत. त्यामुळे या वाहनचालकांवर महाराष्ट्र मोटर वाहन अधिनियम 2013 कलम 134(6) आणि मोटार वाहन कायदा कलम 77 प्रमाणे कारवाई करणे अपेक्षित आहेत. परंतु, ही वाहने पोलीस तपासणीतून सहजासहजी सुटत असल्याचे वास्तव समोर येत आहे. अन्यथा अशी वाहने आपल्याला फिरताना आढळून आली नसती.







