शिरूर: रांजणगाव एमआयडीसी परिसरातील टाटा स्टील डाउनस्ट्रीम लिमिटेड कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ माथाडी मंडळाच्या नावाने बनावट पावत्या देऊन वाहनचालकांकडून प्रत्येकी ८०० रुपये ऑनलाइन वसूल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माथाडी निरीक्षक तथा सरकारी कामगार अधिकारी अजिंक्य बनराव बवले यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, ३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास टाटा स्टील डाउनस्ट्रीम लिमिटेड कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ हा प्रकार घडला.
कंपनीत येणाऱ्या वाहनचालकांकडून माथाडी मंडळाच्या नावाने पावत्या देऊन पैसे घेतले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी केली. त्यावेळी काळ्या रंगाचे हुडी जॅकेट परिधान केलेली व्यक्ती कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत जाणाऱ्या वाहनचालकांना पावत्या देत असून,त्यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने पैसे घेत असल्याचे निदर्शनास आले.पोलिसांना माहिती दिल्यानंतर घटनास्थळी पाहणी करण्यात आली असता, एका ट्रकचालकाकडूनही अशाच प्रकारे पावती घेतल्याचे आढळून आले.

संबंधित पावतीची माथाडी मंडळाच्या कार्यालयाकडे चौकशी केली असता,ती पावती पुणे माथाडी मंडळाकडून देण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे.त्यामुळे माथाडी मंडळाच्या नावाचा गैरवापर करून वाहनचालकांकडून पैसे वसूल केले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

या घटनेच्या चौकशीसाठी टाटा स्टील डाउनस्ट्रीम लिमिटेड कंपनीकडे ३ ऑगस्ट २०२६ रोजीच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्याबाबत ४ ऑगस्ट २०२६ रोजी पत्र देण्यात आले होते.मात्र,फिर्याद दाखल होईपर्यंत कंपनीकडून संबंधित माहिती प्राप्त झाली नसल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
दरम्यान,५ ऑगस्ट २०२६ रोजी माथाडी मंडळाच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी संबंधित वाहनचालकाकडील पावतीची तपासणी केली. ही पावती मंडळाच्या कार्यालयाकडून देण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या पावतीवर माथाडी मंडळाचे नाव वापरण्यात आल्याचेही समोर आले आहे.
या प्रकरणात ‘सुरज’ (पूर्ण नाव व पत्ता उपलब्ध नाही) तसेच ‘इंटनर अजित देविदास’ अशी नावे संशयित म्हणून फिर्यादीत नमूद करण्यात आली आहेत. संबंधित संशयितांची भूमिका आणि या प्रकारामागील अन्य व्यक्तींचा सहभाग याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय रमेश शिंदे करीत आहेत.
माथाडी मंडळाच्या नावाने बनावट पावत्या तयार करून आतापर्यंत किती वाहनचालकांकडून पैसे वसूल करण्यात आले, या प्रकारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का? आणि ऑनलाइन पद्धतीने जमा झालेल्या पैशांचा नेमका मागोवा काय आहे? याचा तपास आता पोलिसांकडून करण्यात येणार आहे.







