लोणी काळभोर, ता. 9 : लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर यांच्याविरोधात मागील अनेक महिन्यांपासून लाचखोरीच्या तक्रारी येत होत्या. मात्र, त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने त्यांना कोणाचे पाठबळ होते, असा सवाल उपस्थित केला जात होता. अखेर अटकपूर्व जामीन अर्जात मदत करण्याच्या नावाखाली 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बाबर यांना हडपसर येथील 15 नंबर चौकाजवळ मंगळवारी (ता. 8) रात्री अकराच्या सुमारास रंगेहाथ पकडले. जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या पोलिस विभागातील अधिकारीच लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात सापडल्याने पुणे शहर पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

कृष्णा जनार्दन बाबर (वय 45, पद-सहाय्यक पोलीस निरीक्षक, नेमणूक लोणी काळभोर पोलीस स्टेशन, पुणे शहर, रा. फ्लॅट नंबर 305, काटे यांची इमारत, क्वीन टावर शेजारी महादेव नगर मांजरी पुणे (वर्ग-2) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी 57 वर्षीय पुरुषाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व त्यांच्या मुलाविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 318 (3), 318(5), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याचा तपास लोकसेवक आरोपी सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर यांच्याकडे आहे. बाबर यांनी तक्रारदार व त्यांच्या मुलाच्या विरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याचे दोषारोप पत्र लवकरात लवकर न्यायालयात दाखल करण्याकरिता 50 हजार रुपये तसेच तक्रारदार यांचा मुलगा प्रतिक याचा उच्च न्यायालयात सुरू असलेल्या अटकपूर्व जामीन अर्जामध्ये मदत करण्याकरिता 2 लाख रुपये लाचेची मागणी केली आहे. याप्रकरणी तक्रारदार यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता, लोकसेवक ए.पी.आय. कृष्णा बाबर यांनी तक्रारदार यांच्या विरुद्ध दाखल गुन्ह्याचे दोषारोप पत्र न्यायालयात लवकरात लवकर दाखल करण्यासाठी 50 हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्यास सहमती दर्शवली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
त्यानंतर पुणे एसीबीने हडपसर जवळील 15 चौकतील शितलादेवी मंदिरासमोर, श्रीकांत ट्रेडिंगच्या दुकानासमोर मंगळवारी (ता.23) सापळा रचला. या सापळ्यात तक्रारदाराकडून सियाज कार एम एच 04- के. बी. 7879 यामध्ये 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हि कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे,अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील पोलीस उप अधीक्षक सतिश वाळके, पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर, पोलीस हवालदार दीपक काकडे पोलीस अंमलदार भूषण ठाकूर, वैशाली माकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.
‘तक्रारी होत्या, मग कारवाई का झाली नाही?’
कृष्णा बाबर यांच्याविरुद्ध यापूर्वीही नागरिकांच्या तक्रारी असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यांच्या कामकाजाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी गेल्याचेही सांगितले जाते. मात्र, या तक्रारींची वेळेत दखल का घेतली गेली नाही? संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई का झाली नाही? एसीबीच्या कारवाईनंतरच प्रशासनाला जाग येते का? तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या यंत्रणेचीही चौकशी होणार का, असे सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहेत.
‘अजून दोन कर्मचाऱ्यांना कोणीतरी आवरा रे!’
लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील आणखी साहेबांच्या जवळील दोन कर्मचारी हे बाबरचे चेले असून त्यांच्याबाबतही तक्रारी असल्याची नागरिकांची चर्चा आहे. किरकोळ अर्जांसाठीही लाखोंची मागणी केली जात असल्याचे आरोप केले जात आहेत. मात्र, या आरोपांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही. त्यामुळे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून सत्य बाहेर आणणे गरजेचे आहे.
नागरिकांची कामे लाचेशिवाय होत नाहीत का?
लाखो रुपये पगार घेऊनही जनतेच्या कामासाठी लाच का मागितली जाते? हा प्रश्न आता केवळ लोणी काळभोरपुरता मर्यादित राहिलेला नाही. पोलिस ठाण्यांमध्ये पारदर्शकता, जबाबदारी आणि भ्रष्टाचारमुक्त कारभारासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. या कारवाईमुळे ‘पोलिस ठाण्यात सामान्य नागरिकांची कामे लाचेशिवाय होत नाहीत का?’ असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी कायद्याचे रक्षण करायचे की त्याच कायद्याच्या नावाखाली नागरिकांकडून पैसे उकळायचे, हा प्रश्न आता पुन्हा ऐरणीवर आला आहे.






