पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीतील मोशी कचरा डेपोमध्ये बुधवारी मोठी दुर्घटना घडली. येथे असलेल्या ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाची तीन मजली प्रशासकीय इमारत कचऱ्याच्या प्रचंड ढिगाऱ्याखाली दबली गेली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला असून त्याचे नाव भावेष वाणी असे आहे. सध्या ढिगाऱ्याखाली ८ कामगार अडकलेले असून, त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांकडून रात्रंदिवस प्रयत्न केले जात आहेत.

ही घटना बुधवारी दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास घडली. कचऱ्याचा डोंगर अचानक सरकल्याने त्याचा प्रचंड दाब इमारतीवर पडला आणि काही सेकंदातच इमारत कोसळली. सुदैवाने, ५ कामगारांनी समयसूचकता दाखवून तिथून पळ काढल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत. मात्र, इतर कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांची अवस्था अत्यंत बिकट असून ते त्यांच्या सुरक्षिततेची प्रार्थना करत आहेत. या कामासाठी पिंपरी-चिंचवड अग्निशमन दल, लष्कर आणि एनडीआरएफच्या जवानांना पाचारण करण्यात आले आहे. आतापर्यंत काही जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजूनही ८ जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. यात महेश कुंभार, सनी माने, राहुल गायकवाड, सुनील कोरके, अक्षय सावंत, रणजित पाटील, नागेश गायकवाड आणि वामन कसबे या कामगारांचा समावेश आहे.

बचावकार्यामध्ये सतत पाऊस आणि कचऱ्याचा उग्र वास येत असल्याने अडचणी येत आहेत. मात्र, प्रशासनाकडून हायड्रोलिक कटर आणि इतर आधुनिक यंत्रांच्या मदतीने काम वेगाने सुरू आहे.







