गणेश सुळ
केडगाव : राज्य शासनाने ११ जानेवारी ते १० फेब्रुवारी या महिनाभराच्या कालावधीसाठी दुधाला प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान जाहीर केले होते. पण अनुदान वाटपाचा कालावधी संपून गेला तरी दूध उत्पादक शेतकरी अजूनही अनुदानापासून वंचित आहेत. त्यामुळे अनुदान कधी मिळणार, ता विवंचनेत दूध उत्पादक शेतकरी आहेत.
राज्यात बहुतांश भागात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून, चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला असताना त्यात शेतकरी जोडधंदा म्हणून दुधाकडे पाहत आहे. परंतु, दुधाचे पडलेले भाव यामुळे बळीराजा दुहेरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात दूध उत्पादक शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या दूध अनुदान वाटपाचा एक महिन्याचा कालावधी संपला असून, ११ फेब्रुवारीपासून परत गायीच्या दुधाचा दर ३.५ फॅटसाठी २७ रुपये झाला आहे. काही संस्थांनी दुधाचा दर २६ रुपयांपर्यंत खाली आणला आहे. त्यामुळे दूध अनुदान वाटप शेतकऱ्यांसाठी मृगजळ ठरले आहे. अजून कुठल्याच दूध संघाने शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान दिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा दूध दराचा प्रश्न ‘जैसे थे’च राहिला आहे.
दूध अनुदान वाटपाचा कालावधी वाढवा; शेतकऱ्यांची मागणी
राज्य सरकारने जाहीर केलेले अनुदान लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा, शिवाय दुधाला नैसर्गिकरीत्या दरात वाढ मिळत नाही. तोपर्यंत दूध अनुदान वाटपाचा कालावधी वाढवा, अशी मागणी शेतकरी करत आहेत. अगोदरच वैरण आणि पशुखाद्यावरील खर्चात मोठी वाढ झाली असल्याने दूध व्यवसाय शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे अनुदान कालावधी वाढविल्याशिवाय शेतकऱ्यांचे दूध व्यवसायातील आर्थिक गणित जुळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
दुधाचे दर कमी होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त
ऐन उन्हाळ्यात दुधाचे दर कमी होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. शासनाने जाहीर केलेले दूध अनुदान अजून मिळाले नाही. दूध अनुदान वाटपाचा कालावधी संपल्याने २५ ते २६ रुपयाने दूध दर मिळत आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर दूध अनुदान जमा करावे व दूध अनुदान वाटपाचा कालावधी वाढवावा.
– गणपत लव्हटे, मा. चेअरमन, जय मल्हार दुध उत्पादक संस्था, देलवडी