संदिप टूले
केडगाव : महिलांसाठी फक्त आरक्षित जागा असेल तरच कुठल्याही पदावर महिलांना फक्त नावालाच पाठले जात असल्याचे आपण नेहमी पाहतो. तसेच शासन निर्णयानुसार शाळा व्यवस्थापन समितीवर ५० टक्के महिला घेण्याचा कायदा केला असल्यामुळे तरी महिलांना या समितीमध्ये स्थान मिळायला लागले होते. पण दौंड तालुक्यातील केडगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या हंडाळवाडीच्या ग्रामस्थांनी शाळा व्यवस्थापन समितीवर एकूण १७ महिलांची निवड करत संपूर्ण शाळा व्यवस्थापन समितीच महिलांच्या हाती देत एक कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.
विद्यार्थांच्या जडणघडणीमध्ये महिलांचे खूप मोठे योगदान असते. पण ते दिसून येत नाही. घरामध्ये महिला आपल्या पाल्यावर जसे विशेष लक्ष ठेवतात. तसेच शाळेतही महिला विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष ठेवतील व महिलांनी फक्त चूल व मूल या संकल्पनेत न ठेवता भविष्यात पुरुषाप्रमाणे महिलांनाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करता यावे यासाठी ग्रामस्थांनी हा वेगळा निर्णय घेतल्याचे बाजार समितीचे माजी सभापती दिलीप हंडाळ यांनी सांगितले.
या हंडाळवाडी शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडीमध्ये अध्यक्षपदी स्वाती संतोष हाके तर उपाध्यक्षपदी स्वाती संदीप हंडाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीवेळी बाळासाहेब महानोर, संदीप पांढरे, माजी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, दत्तात्रय टेंगले, हनुमंत हंडाळ, संजय हंडाळ, धुळाजी मेमाने, दादासाहेब गरदडे, संदीप हंडाळ, चंद्रकांत हंडाळ, सतीश डूबे, प्रा. नीता टेंगले मुख्याध्यापक, शिक्षक यांसह इतर अनेक महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.