नीरा,(पुणे) : पुणे जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नीरा जवळील पाडेगांव येथे ऊसाने भरलेली ट्रॉली अंगावरून गेल्याने दुचाकीवरील वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना पाडेगांव येथील जयदुर्गा मंगल कार्यालयजवळून पाडेगांव फार्मकडे जाणाऱ्या रस्त्यावर ४ मार्चला संध्याकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. अलका किसन लडकत (वय ७०) रा. निळूंज (ता.पुरंदर) असे मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचे नांव आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, ४ मार्चला संध्याकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास किसन विठ्ठल लडकत आणि अलका किसन लडकत (रा.निळूंज, ता.पुरंदर, जि.पुणे) हे पाडेगांव फार्म येथील नातेवाईकांचा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आटोपून दुचाकीवरून नीराच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी समोरून पाडेगांव येथील जुन्या टोल नाक्याजवळ पाडेगांव फार्मकडे ऊसाने दोन ट्रॉली भरून चालल्या होत्या. ट्रँक्टर चालक नितीन शिवाजी भंडलकर हा वेडा वाकडा ट्रँक्टर चालवित असताना दुचाकीला उजव्या बाजूचा पाठीमागील चाकाचा धक्का लागला.
त्यामुळे दुचाकी वरील किसन लडकत आणि अलका लडकत बाजूला पडले. त्यावेळी अलका लडकत यांच्या अंगावरून ऊसाने भरलेल्या दोन ट्रॉल्या गेल्याने त्या जागीच मृत्यूमुखी पडल्या. या घटनेची फिर्याद संदीप दत्तात्रय होले यांनी लोणंद पोलिस स्टेशनमध्ये दिली. यावरून लोणंद पोलिसांनी ट्रँक्टर चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास लोणंद पोलिस करत आहे.