युनूस तांबोळी
शिरूर (पुणे ) : हाती आलेल्या पिकाला भाव नाही, रोगराई, निसर्गाची अवकृपा, विजेचा लपंडाव, वातावरणातील बदल, कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ, कर्जाचा डोंगर, शासनाचे विविध निकष या-ना त्या कारणाने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. नुकताच झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतीचे मोठे नुकसान झाले. नेते फक्त भाषण ठोकतात, मदत मात्र मिळतच नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत.
हिवाळा सुरू झाल्याने थंडीची चाहूल लागत होती. मात्र, अवकाळी पाऊस व गारपिटीचा मार शेत पिकाला बसला. शिरूर तालुक्याच्या बेट भागात सविंदणे, टाकळी हाजी, कवठे येमाई, फाकटे या परिसरात शेत पिकांना त्याचा चांगलाच फटका बसला आहे. ऊस, द्राक्ष, पपई, कांदा व इतर फळबागा उद्धवस्त झाल्या आहेत. मजूर लावून उभी केलेली पिके आडवी पडल्यामुळे कर्जाचा डोंगर झाला आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
गावागावात ग्रामविस्तार अधिकारी, सर्कल, गाव कामगार तलाठी यांनी वरचेवर पहाणी करून नुकसानीचा अंदाज घेतला. त्यामध्ये मोठ-मोठ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पहाणी केली. मात्र, कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसानीची पहाणी केली नसल्याचे शेतकरी हवालदिल झाले आहेत. नुकसानीची योग्य पहाणी करून तत्काळ मदतीसाठी पुढाकार घेतला तरच शेतकरी पुन्हा उभा राहू शकतो, अन्यथा कर्जाच्या बोजाने शेतकऱ्यांचे हाल होतील, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
नुकसानभरपाईची अपेक्षा
शासनाने मोठा गाजावाजा करून एक रूपयात पीकविमा उतरविण्याची घोषणा केली. बहुतांश शेतकऱ्यांनी विमा देखील काढला आहे. मात्र, आजतागायत बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला नसल्याचे शेतकरी सांगतात. आता मोठ्या थाटात आणि वाजत गाजत एक रूपयात विमा उतरविण्याचे गाजर शासनाने दाखवले आहे. मात्र, नुकसानीचा मोबदला मिळाल्याशिवाय गाजर खाल्ल्यासारखे वाटणार नाही. अवकाळी पावसाचा मारा हाती आलेल्या शेतपिकावर झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानभरपाई मिळावी, ही अपेक्षा आहे.