केडगाव, ता. 23 : वरवंड (ता. दौंड) येथे सार्वजनिक शेतरस्त्यावरून उसाची वाहतूक करण्याच्या कारणावरून दोन शेतकरी कुटुंबांत वाद झाल्याची घटना 20 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. रस्त्यावर मुरूम, सिमेंटचे पाइप, मोठे दगड टाकून तसेच पाणी सोडून रस्ता अडविल्याचा आरोप करत एका महिलेने पाच जणांविरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष राजाराम फरगडे, भाउसाहेब राजाराम फरगडे, राजाराम सिताराम फरगडे, निर्मला संतोष फरगडे आणि सोनाली भाउसाहेब फरगडे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी किरण सागर फरगडे (वय 29, रा. वरवंड) यांनी यवत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी किरण यांच्या पतीच्या नावावर वरवंड हद्दीत गट क्रमांक 1557, 1558 व 1560 मध्ये 61 गुंठे शेती आहे. या शेतातून जाणारा 12 फुटांचा सार्वजनिक रस्ता सर्व शेतकरी वापरत आहेत. उसाची तोडणी करून तो गु-हाळाकडे नेण्यासाठी किरण फरगडे या ट्रॅक्टर-ट्रॉलीसह शेताकडे जात होत्या.

त्यावेळी संतोष राजाराम फरगडे, भाउसाहेब राजाराम फरगडे, राजाराम सिताराम फरगडे, निर्मला संतोष फरगडे आणि सोनाली भाउसाहेब फरगडे यांनी ट्रॅक्टर अडविल्याचा आरोप आहे. यावेळी ‘हा आमचा रस्ता आहे, येथून ट्रॅक्टर घेऊन जायचा नाही’ असे म्हणत संबंधितांनी शिवीगाळ व दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाद सोडविण्यासाठी आलेल्या इतर व्यक्तींनाही शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, किरण फरगडे यांनी तत्काळ डायल 112 वर संपर्क साधला. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सार्वजनिक रस्त्यावर अडथळे निर्माण करून वाहतूक रोखल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 126(2), 189(2), 190, 191(2), 296, 352, 351(2)(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.







