मुंबई: मुंबईच्या भायखळा भागात मोहरमच्या मिरवणुकीत एक अतिशय भीषण आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मिरवणुकीत सामील झालेल्या भाविकांना वेदनाशामक औषधे (पेन किलर्स) असल्याचे सांगून चक्क उंदीर मारण्याचे विष असलेल्या ‘झिंक फॉस्फाईड’च्या गोळ्या देण्यात आल्या. या विषारी कॅप्सूलमुळे काही तरुणांची तब्बेत अचानक बिघडली असून, त्यातील एकाची प्रकृती नाजूक असल्याने त्याला तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.

मुंबई पोलिसांनी या गुन्ह्यातील मुख्य संशयिताला रंगेहात पकडले असून, त्याच्याकडे जवळपास 14,000 विषारी कॅप्सूल सापडल्या आहेत. या घटनेची माहिती देताना डीसीपी जयंत मीणा यांनी सांगितले की, मिरवणुकीदरम्यान पहाटे 4 च्या सुमारास काही तरुणांना उलट्या आणि पोटदुखीचा त्रास जाणवू लागला होता. ही गोष्ट लक्षात येताच पोलिसांनी तातडीने धाव घेत या संशयास्पद हालचाली करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले.

तपासात असे समोर आले आहे की, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव फय्याज निसार प्रेमजी असे असून तो पुण्याचा राहणारा आहे. आरोपीने तब्बल 50 किलो झिंक फॉस्फाईड विष मागवून घरीच कॅप्सूल बनवले होते. त्याचे एकूण 30,000 कॅप्सूल बनवण्याचे उद्दिष्ट होते. विशेष म्हणजे, आरोपीने 2025 या वर्षात इराण आणि इराकचा दौरा केला होता, त्यामुळे या प्रकरणाचा तपास पोलीस आता अतिशय गंभीरपणे करत आहेत.
सध्या पोलीस या कटामागील मूळ उद्देश काय होता तो शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. आरोपीला या कृत्यासाठी कोणी मदत केली किंवा तो कोणाच्या सांगण्यावरून हे करत होता, याचा तपास पोलीस करत आहेत.






