सागर जगदाळे

भिगवण: परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी डोळ्यांत स्वप्नं आणि त्या स्वप्नांना बळ देणारे आईवडिलांचे हात असतील, तर संघर्षाच्या वाटेवरूनही यशाची शिखरे गाठता येतात. इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी येथील धनश्री गजानन भोसले हिची कहाणी अशाच जिद्दीची आणि संघर्षाची प्रेरणादायी गाथा आहे. कष्टकरी कुटुंबातून आलेल्या धनश्रीने अभिनय क्षेत्रात आपल्या कलागुणांची छाप उमटवत सन 2024 सालच्या 62 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवात ‘उत्कृष्ट बालकलाकार’ पुरस्कार मिळविला आहे.

धनश्रीचे वडील गजानन भोसले हे रिक्षाचालक म्हणून व्यवसाय करतात. कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि दैनंदिन जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी मुलीच्या स्वप्नांना मात्र परिस्थितीच्या चौकटीत अडकू दिले नाही. रिक्षा चालवून संसाराचा गाडा हाकतानाच, प्रसंगी गावच्या कचरा गाडीवर चालक म्हणून काम करूनही त्यांनी कुटुंबासाठी आणि लेकीच्या भवितव्यासाठी कष्ट सुरू ठेवले.‘आपल्याला जे जमले नाही, ते आपल्या मुलीने साध्य करावे; तिने आकाशात उंच भरारी घ्यावी,’ हीच भावना मनाशी बाळगून गजानन भोसले आपल्या लेकीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांच्या कष्टांच्या रेषांमध्ये मुलीच्या उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न दडलेले आहे.

धनश्रीच्या आईलाही अभिनयाची आवड असून, त्यांनी विविध शॉर्ट फिल्म्समध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे कलेची ओढ आणि अभिनयाची प्रेरणा धनश्रीला घरातूनच मिळाली आहे.‘सावित्रीच्या लेकी’तून राज्यस्तरीय गौरव,निर्माते पुष्कराज बिऱ्हाडे यांच्या ‘सावित्रीच्या लेकी’ या चित्रपटातून धनश्रीने अभिनय क्षेत्रात आपली छाप उमटवली. मुलींच्या संघर्षाची आणि प्रेरणेची कथा मांडणाऱ्या या चित्रपटातील भूमिकेसाठी धनश्रीला 62 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट बालकलाकार म्हणून गौरविण्यात आले.
पुरस्काराच्या सन्मानपत्रानुसार, धनश्रीला कै. गजानन जहागिरदार पारितोषिक, रोख रक्कम व मानचिन्ह प्रदान करण्यात आले आहे. कष्टकरी कुटुंबातील या बालकलाकारासाठी हा सन्मान तिच्या अभिनयप्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.धनश्रीची ही कहाणी केवळ पुरस्काराची नाही; ती कष्टकरी बापाच्या त्यागाची, आईच्या कलाप्रेमाची आणि एका लेकीच्या स्वप्नांवरील अढळ विश्वासाची कहाणी आहे
. रिक्षाच्या चाकांवर संसाराचा गाडा पुढे नेणाऱ्या वडिलांनी लेकीच्या स्वप्नांना पंख दिले आणि धनश्रीने आपल्या कर्तृत्वातून त्या विश्वासाला यशाची किनार दिली.तक्रारवाडीच्या मातीतून उमललेली ही लेक भविष्यात अभिनय क्षेत्रात आणखी उंच भरारी घेईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.







