छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर येथे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी सिद्धार्थ उद्यानातील हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन केले.

कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी मराठवाड्याच्या इतिहासाचा उल्लेख करत सध्याच्या दुष्काळी परिस्थितीवरही भाष्य केले. शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत मदत केली जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच 5 ऑक्टोबरनंतर पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केंद्राकडून NDRFची मदत मिळण्यापूर्वी राज्य सरकारकडून मदत पोहोचवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती आणि कृषी वीजबिलाच्या थकबाकीबाबतही सरकारच्या निर्णयांचा त्यांनी उल्लेख केला. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील पिढीला दुष्काळाचा सामना करावा लागू नये, यासाठी पाणीप्रकल्पांना गती देण्यावर भर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कृष्णा खोऱ्यातील पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी सुरू असलेल्या कामाचा उल्लेख करताना सुमारे 30 TMC अतिरिक्त पाणी उपलब्ध होण्याची माहिती त्यांनी दिली. याशिवाय उल्हास खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यात 70 TMC पाणी आणण्याच्या नदीजोड प्रकल्पाचा DPR अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून भविष्यात शहराला नियमित पाणीपुरवठा होईल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला. शहरात उद्योग आणि गुंतवणूक वाढत असल्याने त्यानुसार पायाभूत सुविधा विकसित करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.






