लोणी काळभोर, ता. 30 : मांजरी बुद्रुक (ता. हवेली ) येथील घुले रोड परिसरातील स्वप्नशिल्प सोसायटीमधील एका सदनिकेत घरफोडी करून चोरट्यांनी 65 हजार रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकूण 1 लाख 72 हजार 700 रुपयांचा ऐवज लंपास केला. विशेष म्हणजे, घराचा मुख्य दरवाजा बंद असतानाही चोरट्यांनी गॅलरीच्या दरवाजातून प्रवेश करून घरफोडी केली आहे.

याप्रकरणी चंद्रमणी सुनील सूर्यवंशी (वय 33 , रा. ड्रीम व्हिला, घुले रोड, मांजरी बुद्रुक) यांनी मांजरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूर्यवंशी दाम्पत्य आणि त्यांचा मेव्हणा नोकरीसाठी घराबाहेर 28 ऑक्टोबर रोजी सकाळी गेले होते.
दरम्यान, रात्री सव्वादहाच्या सुमारास ते घरी परतले असता घराचा मुख्य दरवाजा बंद होता. मात्र, आत प्रवेश केल्यानंतर गॅलरीचा दरवाजा आणि खिडकी उघडी असल्याचे दिसले. तसेच गॅलरीतील फुलझाडांच्या कुंड्याही पडलेल्या होत्या. बेडरूममधील कपाटाचे दरवाजे उघडे असल्याचे निदर्शनास आले. कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेली 65 हजार रुपयांची रोकड, सोन्याच्या तीन अंगठ्या आणि सोन्याची साखळी असा ऐवज गायब असल्याचे आढळले.

अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून हा ऐवज चोरून नेल्याची तक्रार सूर्यवंशी यांनी मांजरी पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 – 305,331(3),331(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिवसभर बंद असलेल्या घरांवर चोरट्यांची नजर असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या चोरीचा तपास मांजरी पोलीस करीत आहेत.








