उरुळी कांचन (पुणे) : उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगाराचे अड्डे राजरोसपणे सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पथकाने उरुळी कांचनमधील बाजार मैदानावरील सम्राट कामगार संस्था कार्यालयाच्या आडोशाला सुरू असलेल्या ‘कल्याण मटका’ जुगारावर धडक कारवाई केली आहे.

या कारवाईत 6 जणांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांच्याकडून रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार विशाल हरिश्चंद्र जावळे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, दौंड उपविभाग, दौंड ,पुणे ग्रामीण यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

संजय पांडुरंग पवार (वय-38, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) संतोष शिवाजी कांचन (वय 42, रा. तळवडी चौक, उरुळी कांचन), समाधान बबन रेवडकर (वय 30, रा. तुपेवस्ती, उरुळी कांचन), मुसा ताजुद्दीन फुलारी (वय -45, रा. कुंजीरवाडी, ता. हवेली), मनोज रामदास काकडे (वय 50, रा. उरुळी कांचन), व संतोष रामचंद्र चव्हाण (वय 45, रा. यशवंतनगर, यवत, ता. दौंड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. 12) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे पोलीस हवालदार विशाल हरिश्चंद्र जावळे हे पथकासह गस्त घालत असताना, उरुळी कांचन येथील बाजार मैदानावरील सम्राट कामगार संस्था कार्यालयाच्या आडोशाला काही व्यक्ती बेकायदा मटका जुगार खेळत व खेळवत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ तिथे छापा टाकत 6 जणांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी पकडलेल्या आरोपींकडे कसून चौकशी केली असता, हा जुगार नेमका कोणाचा चालतो? याचे बिंग फुटले. त्यांनी मटक्याचा मालक गणेश रामचंद्र कांचन आणि विकी महादेव कांचन (दोघे रा. उरुळी कांचन) असल्याचे सांगितले. पोलीस आता या मुख्य चालकांचा शोध घेत आहेत.
दरम्यान, विशेष म्हणजे, आरोपींपैकी मनोज रामदास काकडे हा सराईत जुगारी असून, त्याच्याविरोधात यापूर्वीही उरुळी कांचन पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायद्यांतर्गत गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. यावेळी पोलिसांनी 12 हजार 70 रुपये रोख रक्कम व निळ्या शाईचे बॉलपेन 5 स्लीप बुक्स असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार गाडेकर करत आहेत.







