गणेश सुळ
केडगाव : दौंड पोलीस स्टेशनचा नव्यानेच पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव या ‘सिंघम’ अधिकाऱ्याची बदली झाली. इतक्या चांगल्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदली झालीच कशी इथपासून ती नेमकी कशामुळे? का झाली? किंबहुना त्यांच्या बदलीची ही बातमी अफवाच ठरावी इथपर्यंतच्या चर्चेला शहरात उधाण आले होते. मात्र, आता त्यांची बदली झाली आहे.
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी नुकताच दौंड पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारला आणि त्या दिवसापासूनच त्यांची कारकीर्द गाजत आहे. पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्या पंधरा दिवसातच त्यांनी विविध गुन्ह्यात फरार असणाऱ्या जवळपास 30 ते 35 जणांना जेलची हवा दाखविली आहे. लग्न समारंभात सामील होऊन वराडी मंडळींचे दागिने व पैसे चोरणाऱ्या टोळीला त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने जेरबंद केले.
शहरातील सर्व अवैध धंदे त्यांच्यामुळेच बंद आहेत. शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लागावी म्हणून बाजारपेठेतील रस्त्यांच्या कडेला असणाऱ्या अतिक्रमणांवर त्यांनी कारवाई करून अतिक्रमणे काढली व शहरातील रस्ते त्यांनी मोकळे केले आहेत. महिला व मुलींची छेडछाड करणाऱ्या रोडरोमिओ विरोधात त्यांनी मोहीम हाती घेतली आहे. अशा त्यांच्या कारकिर्दीचा आलेख चढत असताना त्यांची बदली कशी काय होऊ शकते, असा प्रश्न दौंडकरांना पडला आहे. पोलीस स्टेशनला आल्यानंतर पोलिसांनी, साहेबांनी किमान त्यांचे ऐकून तरी घ्यावे, अशी सामान्य माणसाची अपेक्षा असते आणि त्यांची ही अपेक्षा चंद्रशेखर यादव यांनी पूर्ण केली होती, असा अनुभव दौंडकर नागरिकांना आला आहे.
अशा त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे त्यांच्या कारकिर्दीचा आलेख उंचावत असतानाच त्यांच्या बदलीची बातमी शहरात पसरली आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची बदली होऊ नये व ही बातमी म्हणजे अफवाच ठरावी, अशी अपेक्षा दौंडकर नागरिक व्यक्त करत होते. मात्र, ही अफवा नसून वास्तव असल्याचे समजताच नागरिकांमध्ये नाराजीचा सुर उमटू लागला आहे.