दौंड, ता. २३ : दौंड शहर आणि परिसरात दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांविरोधात दौंड पोलिसांनी मोठी मोहीम राबवली असून तब्बल सात जणांना हद्दपार करण्यात आले आहे. वारंवार गंभीर गुन्हे, मारामाऱ्या, दहशत, गोवंश हत्या आणि शांतता भंग करणाऱ्या प्रवृत्तींना लगाम घालण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. याशिवाय शेकडो गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करत शांतता राखण्याचे बॉण्डही घेतले आहेत.
त्यागी शांताराम रणदिवे, आकाश दीपक माने, गौरव उर्फ आक्षय अशोक काळे ( (तिघे रा. सिद्धार्थनगर, दौंड)हसन हाशमी कुरेशी, जमील इस्माईल कुरेशी आणि फैजान अब्दुला कुरेशी (तिघे रा. खाटीक गल्ली, दौंड) व महेश रमेश चोरमले (रा. गोपाळवाडी, ता. दौंड) अशी हद्दपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शरीराविरुद्धचे गुन्हे करून परिसरात दहशत निर्माण करणारे त्यागी शांताराम रणदिवे, आकाश दीपक माने आणि गौरव उर्फ आक्षय अशोक काळे यांच्यावर मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५५ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या तिघांना पुणे जिल्हा, पुणे शहर, पिंपरी-चिंचवड तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा आणि पारनेर तालुक्याच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.
दौंड शहरात वारंवार गोवंश हत्या करून धार्मिक भावना दुखावणे आणि दोन समाजांत तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली लड्डू उर्फ हसन हाशमी कुरेशी, जमील इस्माईल कुरेशी आणि फैजान अब्दुला कुरेशी (सर्व रा. खाटीक गल्ली, दौंड) यांच्यावरही मुंबई पोलीस अधिनियमाच्या कलम ५५ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या तिघांना दौंड, बारामती, हवेली, इंदापूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.
याशिवाय गंभीर गुन्ह्यांमध्ये नाव असलेल्या महेश रमेश चोरमले (रा. गोपाळवाडी, ता. दौंड) याच्यावर मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५६ (ब) अंतर्गत कारवाई करून त्याला पुणे, सोलापूर, सातारा आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतून एका वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. दौंड पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीवर अंकुश ठेवण्यासाठी आणखी काही प्रस्तावही दाखल केले आहेत. त्यामध्ये मुंबई पोलीस अधिनियम कलम ५६ (ब) अंतर्गत दोन गुन्हेगार, कलम ५५ अंतर्गत एक गुन्हेगार तसेच एमपीडीए कायद्यांतर्गत तीन गुन्हेगारांविरोधात प्रस्ताव सुनावणीसाठी प्रलंबित आहेत.
दरम्यान, शहरातील भांडणे, मारामाऱ्या, दमदाटी आणि शांतता भंग करणाऱ्या प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या विविध कलमांनुसार शेकडो गुन्हेगारांकडून शांतता राखण्याचे बॉण्ड घेण्यात आले आहेत. तसेच अवैध दारू विक्री करणाऱ्या १७ जणांकडून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत दोन वर्षांसाठी चांगल्या वर्तणुकीचे अंतरीम बंधपत्र घेण्यात आले आहे.
या व्यापक कारवाईमुळे दौंड शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीला मोठा आळा बसणार असल्याचा विश्वास पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव धडस आणि दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाल पवार यांनी याबाबत माहिती दिली.







