दौंड, ता. 11: दौंडकडे कोणता रोड जातो, असा पत्ता विचारण्याचा बाहाणा करून दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेणाऱ्या तिघांना दौंड पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. हि घटना वाटलुज (ता. दौंड) येथे मंगळवारी (ता. 10) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली होती. (Daund Crime)

अनिकेत बाळु खंडाळे (रा. तांदुळवाडी ता. दौंड), अतुल रघुनाथ जगताप (रा. डोर्लेवाडी ता. बारामती), सुरेश संजय वायकर (रा. बांदलवाडी ता. बारामती) अशी सोनसाखळी चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल शंभर टक्के हस्तगत करण्यात आला असून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी सुरेखा संपत कोपनर (वय 40, व्यवसाय-मजुरी, रा. मलठण, ता. दौंड, जि. पुणे) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरेखा कोपनर मंगळवारी दीड वाजण्याच्या सुमारास वाटलुज येथे गावावरून घरी जाण्यासाठी रस्त्यावर उभ्या होत्या. त्यावेळी आरोपी अनिकेत खंडाळे, अतुल जगताप, सुरेश वायकर यांनी दौंडकडे जाणारा रस्ता विचारण्याचा बहाणा केला. पत्ता विचारत जवळ येऊन आरोपींनी फिर्यादींच्या गळ्यातील सुमारे 1 तोळा वजनाचे व 1 लाख 50 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने ओढून हिसकावले व मोटारसायकलवरून पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच दौंड पोलिसांनी तात्काळ पथक रवाना केले. मलठण गावातील स्थानिक नागरिकांच्या मदतीने आरोपींना पकडण्यात यश आले. चोरीस गेलेले मंगळसूत्र 100 टक्के हस्तगत करण्यात आले असून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार सागर म्हेत्रे करीत आहेत.







