पिंपरी: संसार (Pimpri-Chinchwad) म्हटला की भांड्याला भांडं लागणारच, असं म्हटलं जातं. पण कधीकधी हेच छोटे वाद एका हसत्याखेळत्या आयुष्याचा शेवट करू शकतात, याचा प्रत्यय पिंपरी-चिंचवडमध्ये आला आहे. चिखली परिसरात राहणाऱ्या 23 वर्षीय प्रतीक संदीप घनवटे या तरुणाने आपल्या पत्नीशी फोनवर झालेल्या वादानंतर विष प्राशन करून जीवनयात्रा संपवली.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक आणि त्याच्या पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून खटके उडत होते. कौटुंबिक मतभेद इतके वाढले होते की, त्याची पत्नी त्याला सोडून माहेरी राहत होती. पत्नीला पुन्हा घरी आणण्यासाठी प्रतीक मनाची तयारी करत होता आणि तिला भेटण्यासाठी तो स्वतः गुजरातला जाणार होता. मात्र, 6 फेब्रुवारी रोजी घरातून निघण्यापूर्वी दोघांमध्ये फोनवर पुन्हा एकदा जोरदार वाद झाला. या वादाने प्रतीकच्या मनावर इतका खोलवर परिणाम केला की, रागाच्या भरात त्याने टोकाचे पाऊल उचलण्याचे ठरवले आणि विष प्राशन केले.
विष घेतल्याचे समजताच कुटुंबीयांनी त्याला तातडीने पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती (YCM) रुग्णालयात दाखल केले.डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र मंगळवारी (10 फेब्रुवारी) उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.








