लोणी काळभोर, ता. ११ : व्यावसायिकाकडे तब्बल ५० कोटी रुपयांची खंडणी मागून धमकी, त्यानंतर गोदामाच्या लोखंडी गेटवर चार राऊंड गोळीबार आणि कुटुंबीयांना संपविण्याची धमकी देणाऱ्या कथित बिष्णोई टोळीच्या आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी पुणे पोलिसांनी पंजाब, राजस्थान आणि हरियाणा या राज्यांत धाडसी व जोखमीची शोधमोहीम राबविली. या तपासात महत्त्वाची भूमिका बजावणारे पुणे शहर गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार नितीन मारुती मुंढे (बक्कल क्र. ७३१७) यांचा पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला.

उरुळी देवाची (ता. हवेली) परिसरातील एका लोखंड व्यावसायिकाला २२ जून रोजी व्हॉट्सअॅप कॉल करून ‘५० कोटी रुपये दे, दोन दिवसांची मुदत आहे; अन्यथा माझा वेळ सुरू होईल,’ अशा शब्दांत धमकी देण्यात आल्याची तक्रार फुरसुंगी पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. संबंधित व्यावसायिकाच्या नातेवाईकालाही फोन करून त्याच्याकडे प्रत्येकी पाच कोटी रुपये देण्याची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे.

खंडणीची मागणी अन् काही तासांतच गोदामावर गोळीबार

तक्रारदार पोलिस ठाण्यात पोहोचले असतानाच त्यांच्या उरुळी देवाची येथील लोखंडाच्या गोदामावर चार राऊंड गोळीबार झाल्याचे समोर आले. त्यानंतर पुन्हा धमकीचे कॉल करून ‘आता गोदामाबाहेर गोळीबार केला आहे, पुढे आत गोळ्या चालतील; वाटेत जो कोणी मिळेल त्याच्यावर गोळी चालवू,’ अशा स्वरूपाच्या धमक्या देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या घटनेमुळे उरुळी देवाची परिसरात खळबळ उडाली होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
पंजाब, राजस्थान, हरियाणात पोलिसांची धडक मोहीम
फुरसुंगी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास करताना पोलीस हवालदार नितीन मुंढे यांनी तपास पथकासोबत पंजाब, राजस्थान आणि हरियाणा या राज्यांमध्ये शोधमोहीम राबविली. तपासादरम्यान कथित आरजू बिष्णोई टोळीशी संबंधित आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईत पोलिसांनी तीन अग्निशस्त्रे, तीन मॅगझिन आणि ४० जिवंत काडतुसे जप्त केली. त्यामुळे गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणण्यासह संभाव्य पुढील गुन्हे रोखण्यात पोलिसांना यश आल्याचे प्रशस्तिपत्रात नमूद करण्यात आले आहे.
धाडस आणि तपासकौशल्याची पोलिस आयुक्तांकडून दखल
फुरसुंगी पोलिस ठाण्यातील भारतीय न्याय संहिता कलम ३०८(५), ३५१(३) तसेच आर्म्स अॅक्टच्या संबंधित कलमांनुसार दाखल गुन्ह्याच्या तपासात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस हवालदार नितीन मुंढे यांना प्रशस्तिपत्र देण्यात आले. अद्वितीय धैर्य, उत्कृष्ट तपासकौशल्य, कर्तव्यनिष्ठा, व्यावसायिक प्रावीण्य आणि समर्पित सेवाभावाबद्दल पुणे शहराचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्यांचे कौतुक केले.







