युनूस तांबोळी / शिरूर : विश्वातील उर्जाश्रोत असलेल्या मातेची उपासना करून तिला विश्वाच्या कल्याणासाठी सकारात्मक दिशेकडे आकर्षीत करण्यासाठी जागरणाच्या कार्यक्रमातून प्रसन्न करण्याचा प्रयत्न भक्तांकडून होत असतो. नमो नमो दुर्गे सुखकरणी, नमो नमो दुर्गे दुःख हरनी … आरती करत ‘श्री मेसाई माते की जय’च्या जयघोषात शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथील श्री मेसाई देवी नवरात्र उत्सवात देवीचे दर्शन घेऊन भावीक भक्तीचा जागर करत दर्शनासाठी गर्दी करत आहेत.
कान्हूर मेसाई गावातच हेमांडपंथी दक्षिणाभिमुखी श्री मेसाई देवीचे मंदिर आहे. कमानीतून गेल्यावर पितळी मोठी घंटा पुढे वाघाची मुर्ती आणी समोरच श्री मेसाई देवीच्या मुर्तीचे दर्शन घडते. देवीच्या पाठिमागे एका हातात त्रीशूल व दुसऱ्या हातात दैत्याचे शिर असलेली आदी माया शक्ती महिषासूर मर्दीनी ची मुर्तीचे दर्शन घडते. डाव्या बाजूने देवीला प्रदिक्षणा घालून पुन्हा मंदिरासमोर भक्तगण येऊन मनोभावे देवीचे दर्शन घेतात.
येथील भक्त कपाळाला गंध व कुंकू लावून नवसाला पाव ग माय लेकराला…असा आर्शीवाद देतात. कुलदैवत, ग्रामदैवत तसेच नवसाला पावणारी देवी म्हणून राज्यात श्री मेसाई देवी प्रसिद्ध आहे. त्यामुळे वर्षभर येथे भक्त मोठ्या संख्येने मुक्कामाला असतात. हा भाग दुष्काळी असला तरी ग्रामस्थांच्या पुढाकाराने येथे पाण्याची सुविधा करण्यात आली आहे. राहण्याची तसेच आंघोळीसाठी सुविधा करण्यात आली आहे.
निवास स्थान देखील बनविण्यात आले असून प्रशस्त सभागृह असल्य़ाने भक्तांची येथे गैरसोय होत नाही. त्यामुळे नाशिक, पुणे, नगर, मुंबई, औरंगाबाद, बीड, उस्मनाबाद या भागातून मोठ्या प्रमाणात भाविक येथे येत असतात. विशेष करून तृतीयपंथी नेहमीच भक्तीभावाने दर्शनासाठी गर्दी करताना दिसतात. यावर्षी नवरात्र उत्सवाचे ५२ वे वर्ष असून येथे अंखड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिरात हरिपाठ, ज्ञानेश्वरी पारायण, किर्तन असे धार्मिक कार्यक्रम आयोजीत करण्यात आले आहे.