फुरसुंगी, ता. ४ : नवीन वीजमीटर जोडणीच्या कामासाठी १२ हजार रुपयांची लाच मागणी करून त्यापैकी पहिला टप्पा 4 हजार 500 रुपयांची लाच स्वीकारून उर्वरित राहिलेली ७ हजार 500 रुपयांची लाच स्वीकारताना महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले आहे. हि कारवाई हडपसर, उपविभाग-दोन येथे आज बुधवारी (ता.4) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आहे.

आरोपी रामचंद्र नारायण लोंढे (वय ४२) हे महावितरणच्या हडपसर उपविभाग-२ येथे अतिरिक्त कार्यकारी अभियंता (वर्ग-१) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या अधिकार्याचे नाव आहे. याप्रकरणी एका ४३ वर्षीय इलेक्ट्रिकल सब कॉन्ट्रॅक्टरने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे इलेक्ट्रिकल सब कॉन्ट्रॅक्टर असून ते महावितरणाची कामे
करतात. महावितरणचे उप विभाग-2, हडपसर, पुणे चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता लोंढे हे तक्रारदार यांनी केलेल्या नवीन 12 वीजमीटर जोडणीच्या कामाचे एक हजार रुपये प्रतिमीटर प्रमाणे तक्रारदाराकडे बारा मीटरचे 12 हजार रुपयांची मागणी करत आहेत. तसेच तक्रारदार यांना मिळालेल्या अन्य एका नवीन इमारतीच्या वीज कनेक्शनच्या कामाकरिता 50 हजार रुपयांची मागणी लोंढे हे करीत आहे. अशी तक्रार तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग केली होती.
मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता, आरोपी लोकसेवक अतिरिक्त कार्यकारी अभियंता लोंढे यांनी तक्रारदाराकडून बसविण्यात आलेल्या नवीन 12 वीजमीटर जोडणीचे प्रतिमीटर 1 रुपये प्रमाणे बारा मीटरचे 12 लाचेची मागणी करून त्यातील 4 हजार 500रुपये यापूर्वी घेतल्याचे कबूल केले व उर्वरित 7 हजार 500 रुपयांचीलाच तक्रारदाराकडे लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आरोपी लोकसेवक रामचंद्र नारायण लोंढे यांना तक्रारदाराकडून कामाच्या मोबदला म्हणून 7,500 रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. वरील आरोपीस ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध फुरसुंगी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







