पुणे: पुण्यातील वारजे परिसरात एका 82 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी केलेल्या तत्पर कारवाईमुळे एक मोठा अनर्थ टळला. विस्मरणाचा त्रास असलेले हे आजोबा 30 मे रोजी दुपारच्या सुमारास स्कुटी घेऊन घराबाहेर पडले होते. बराच वेळ उलटूनही ते घरी परतले नाहीत. संध्याकाळी त्यांच्या मुलीने आणि जावयाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत मदत मागितली. आजोबा फोनवर बोलत होते, मात्र ते नेमके कुठे आहेत याची त्यांनाच कल्पना नव्हती. त्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली होती.

ड्युटीवर असलेल्या पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत शिरोळे यांनी तातडीने परिस्थितीची माहिती घेतली. मुलगी सतत वडिलांशी संपर्क साधत होती, पण त्यांच्याकडून ठिकाणाबाबत कोणतीही स्पष्ट माहिती मिळत नव्हती. पोलिसांनीही आजोबांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, फोनवरून सतत वाहनांचे आवाज येत असल्याने ते एखाद्या गजबजलेल्या रस्त्याजवळ असल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला.
यानंतर पोलिसांनी तांत्रिक मदतीचा आधार घेतला. पोलिस अंमलदार शिरीष गावडे यांनी मोबाइल क्रमांकाच्या आधारे लोकेशन शोधण्याची प्रक्रिया सुरू केली. काही वेळातच आजोबांचे लोकेशन पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील खंडाळा परिसरात असल्याचे समोर आले. वारजेपासून तब्बल 72 किलोमीटर अंतरावर ते पोहोचल्याचे कळताच सर्वांनाच धक्का बसला. अंधार वाढत होता आणि वेगवान वाहतुकीमुळे त्यांच्या सुरक्षिततेची चिंता अधिक वाढली.
पोलिसांनी तातडीने महामार्ग पोलिसांशी संपर्क साधला. खंडाळा विभागातील महामार्ग पोलीस अंमलदार हनुमंत कोळी यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे शोधमोहीम सुरू केली. मोबाइल लोकेशनच्या मदतीने त्यांनी आजोबांचा शोध घेत त्यांना सुरक्षित ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्या मुलगी आणि जावयाला याची माहिती देण्यात आली. कुटुंबीयांनी खंडाळ्यात जाऊन आजोबांना सुखरूप घरी आणले.
पोलिसांची तत्परता, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि विविध यंत्रणांमधील समन्वय यामुळे विस्मरणाच्या त्रासाने ग्रस्त असलेल्या ज्येष्ठ नागरिकाला सुरक्षितपणे घरी परत आणण्यात यश आले. या घटनेमुळे पोलिसांच्या दक्षतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.







