लोणी काळभोर, ता. २३ : फुरसुंगी-उरुळी देवाची येथील पुणे महापालिकेच्या कचरा डेपोवर सुरू असलेल्या कथित कचरा टाकण्याच्या प्रकाराविरोधात शुक्रवारी स्थानिक नगरसेवक आणि ग्रामस्थांनी आक्रमक आंदोलन छेडत कचरा गाड्यांचा मार्ग रोखला. “ओपन डंपिंग बंद करा”, “नागरिकांच्या आरोग्याशी खेळ थांबवा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. अखेर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी आंदोलकांशी दूरध्वनीवरून संवाद साधत उपाययोजनांचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
फुरसुंगी येथील महापालिकेच्या कचरा डेपो परिसरात मोठ्या प्रमाणात उघड्यावर कचरा टाकला जात असल्याचा आरोप करत फुरसुंगी नगरपरिषदेचे नगरसेवक, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सकाळी डेपोसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. आंदोलकांनी कचरा वाहून आणणाऱ्या गाड्या अडवत डेपोमध्ये प्रवेश रोखला. त्यामुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
आंदोलनाची माहिती मिळताच पुणे महापालिकेचे उपायुक्त सुरेश वारुळे यांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी महापालिका कोणतीही प्रक्रिया न करता थेट उघड्यावर कचरा टाकत असल्याचा आरोप केला. परिणामी परिसरात कचऱ्याचे प्रचंड ढीग साचले असून दुर्गंधी आणि प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
प्रदूषण नियंत्रण मंडळाने उघड्यावर कचरा टाकू नये, अशा सूचना दिल्यानंतरही नियमांचे उल्लंघन सुरूच असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. “स्थानिक नागरिकांच्या जीवाशी खेळणारे ओपन डंपिंग तातडीने बंद झाले पाहिजे,” अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत केली.
दरम्यान, आंदोलनामुळे पुणे शहरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्नही ऐरणीवर आला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी आंदोलकांशी थेट संवाद साधत लवकरच ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आल्याची माहिती नगरपरिषदेचे आरोग्य सभापती ॲड. अमोल कापरे, शीतल अमित हरपळे, संतोष हरपळे, सचिन हरपळे, स्नेहा हरपळे, भावना ढमाळ तसेच सामाजिक कार्यकर्ते दत्ता राऊत आणि तात्या भाडळे यांनी दिली.
यावेळी बोलताना आरोग्य सभापती ॲड. अमोल कापरे म्हणाले, “फुरसुंगी कचरा डेपोमध्ये तब्बल २० हजार टन कचरा उघड्यावर टाकण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारची प्रक्रिया होत नसल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. पुणे महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ नागरिकांची दिशाभूल करत आहेत. मात्र उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि आयुक्तांनी प्रश्न गांभीर्याने घेतल्याने आम्ही आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.”







