बारामती: बारामती तालुक्यात नवजात मुलीला जन्मानंतरच बेवारस अवस्थेत सोडून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तांदूळवाडी येथील दादा पाटीलनगर रेल्वे पुलाखाली ही चिमुकली जिवंत अवस्थेत आढळली. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

बुधवारी पहाटे सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास रेल्वे पुलाच्या आतून बाळाच्या रडण्याचा आवाज नागरिकांच्या कानावर पडला. आवाजाच्या दिशेने पाहिले असता, कपड्यात गुंडाळलेली नवजात मुलगी तेथे आढळून आली. नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.

दरम्यान, पोलिसांनी चिमुकलीला ताब्यात घेत तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सध्या तिची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून, तिच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

दरम्यान, नवजात बालिकेला जन्मानंतर अशा प्रकारे रेल्वे पुलाखाली सोडून देण्यात आल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. या घटनेमागील कारण काय आहे, तसेच मुलीला तेथे कोणी आणून सोडले, याचा तपास पोलीस करत आहेत.
या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात आई-वडील तसेच संबंधित व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, नवजात मुलीला सोडून जाणाऱ्या व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून शोधमोहीम राबवली जात आहे. या घटनेचा पुढील तपास बारामती तालुका पोलीस करत आहेत.







