दीपक खिलारे
इंदापूर : राज्यातील प्रत्येक घटकांसाठी सहज लाभदायी असणाऱ्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे राज्य प्रमुख रामहरी राऊत यांनी केले. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे कार्यपद्धती लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने आरोग्यवारी तथा आरोग्य संवाद यात्रेचे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने आयोजित केले आहे. त्या अनुषंगाने इंदापूर येथे शुक्रवारी (दि. 20) शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद पार पडली.
यावेळी बोलताना रामहरी राऊत म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरायम आरोग्याचा प्रकाश आणला आहे. या योजनेमुळे अनेक रुग्णांना अक्षरशः जीवनदान मिळत असल्याने ही योजना आता महाराष्ट्र राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना ठरत आहे.
राज्यातील गोर गरीब – गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून थेट अर्थसहाय्य केले जात आहे. या योजनेमुळे रुग्णांचे प्राण वाचत असल्याने मुख्यमंत्री कार्यालयात आलेला एकही रुग्ण हा मदतीविना वंचित राहता कामा नये याची दक्षता घेतली जात आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने गेल्या २ वर्षं २ महिन्यामध्ये ४०,००० पेक्षा अधिक गोरगरीब – गरजू रुग्णांना एकूण ३४९ कोटी रुपयांची आर्थिक मदत वितरित केली असल्याचे राऊत यांनी सांगितले.
पुढे बोलताना म्हणाले, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मध्ये रुग्णालय अंगीकृत करण्याची आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मधून रुग्णांनी अर्थसहाय्य मिळविण्याची प्रक्रिया संपूर्णतः निःशुल्क आहे. रुग्णांनी किंवा रुग्णांच्या नातेवाईकांनी स्वतः थेट अर्ज करण्यासाठी 8650567567 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करुन थेट आपल्या मोबाईलवर अर्ज मिळवून स्वतः अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय मदत योजनेत अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, कर्करोगावरील शस्त्रक्रिया, केमोथेरपी, डायलिसिस, जन्मतः मूकबधिर लहान मुलांच्यासाठी अत्यावश्यक असणारी कॉकलीयर इनप्लांट शस्त्रक्रिया, सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, विद्युत अपघात, भाजलेले रुग्ण, जन्मतः लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे. दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्यप्रमुख रामहरी राऊत यांनी यावेळी केले.
या पत्रकार परिषदेत शिवसेना जिल्हाप्रमुख सीमा कल्याणकर, उपजिल्हा प्रमुख अण्णा काळे, वैद्यकीय मदत कक्षाचे उपजिल्हा प्रमुख विशाल धुमाळ, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे इंदापूर तालुका संघटक सुरेश मिसाळ, शिवसेना तालुका प्रमुख रामचंद्र जामदार, शहर प्रमुख शुभम जामदार, महिला आघाडी उप तालुका प्रमुख कमल लोंढे, तालुका संघटक विजय पवार उपस्थित होते.