जुन्नर, (पुणे) : लग्नाच्या वेळी जर वधू किंवा वर यांच्यापैकी कुणाचेही वय कायद्याला मान्य असलेल्या वयापेक्षा कमी असेल तर त्यांचा विवाह बालविवाह ठरतो. या कायद्याने बालविवाह घडवून आणणे, तत्संबंधित सर्व सोहळे व इतर गोष्टीवर प्रतिबंध घातला आहे. हे असतानादेखील सोमतवाडी (ता. जुन्नर) येथील भवानी लॉन्स मंगल कार्यालयात शनिवारी (ता. १६) बालविवाह झाला. या बालविवाहप्रकरणी वरासह वधू-वराचे आई व वडील, भटजी, हॉल मालक, तसेच ४० ते ५० ग्रामस्थांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली.
याप्रकरणी ग्रामसेविका अश्विनी नेहरकर यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रलीधर भिवा रघतवान, निर्मला मुरलीधर रघतवान (दोघेही रा. सोनावळे, ता. जुन्नर), अतिश नंदाराम नवले, नंदराम दगडू नवले, शारदा नंदराम नवले, दशरथ दगडू नवले (सर्व रा. कालदरे, ता. जुन्नर), तसेच भटजी नरहरी जोशी (रा. वडज, ता. जुन्नर), हरी किसन गाडे (रा. सोमतवाडी, ता. जुन्नर) व इतर ५० ग्रामस्थांवर बालविवाह प्रतिबंध अधिनियमाचे विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमतवाडी (ता. जुन्नर) येथील भवानी लॉन्स मंगल कार्यालयात शनिवारी (ता. १६) बालविवाह होणार आहे, अशी माहिती जुन्नर तालुका पंचायत समितीचे विस्तार अधिकारी धेंडे व तालुका महिला व बाल संरक्षण अधिकारी भाग्यश्री घाडगे यांनी ग्रामसेविका अश्विनी नेहरकर यांना दिली होती.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने, अश्विनी नेहरकर यांनी सोनावळे येथील ग्रामसेविका कविता शिंदे, अंगणवाडी सेविका सुवर्णा सोनवणे, शैला बर्डे, पोलिस अंमलदार पवार यांच्या मदतीने बालविवाह रोखण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या शाळा सोडल्याच्या दाखल्याचे झेरॉक्स प्रतिची शंका वाटली. त्यानुसार, ‘वधूच्या वयाची खात्री होत नाही तोपर्यंत लग्न लावू नका’, असे सांगितले.
दरम्यान, मुलीच्या वयाची खात्री करत असताना हॉलमध्ये मंगलाष्टका सुरू झाल्या. नेहरकर व त्यांचे सहकारी लग्न हॉलमध्ये पोहचेपर्यंत मुला-मुलीचे आई-वडील, पाहुणे, नातेवाईक व ग्रामस्थ यांनी मुलीचे वयाची खात्री न करता लग्नाचा विधी पूर्ण पार पाडला. याप्रकरणी ग्रामसेविका अश्विनी नेहरकर यांनी फिर्याद दिली. त्यानुसार या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला.