लोणी काळभोर, (पुणे) : माहिती सेवा समितीचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष व बकोरी येथील वनराईचे वृक्षप्रेमी चंद्रकांत गोविंद वारघडे यांना सायबर चोरट्यांनी फोन मध्ये बोलण्यात गुंतवून फक्त दोन तासात दीड लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.
सामाजिक हितासाठी परिसरामध्ये धावून जाणाऱ्या चंद्रकांत वारघडे यांचीच फसवणूक झाल्याने अनेक व्यावसायिक, खातेदार यांचे धाबे दणाणले असून दैनंदिन बँकेमध्ये व्यवहार करणाऱ्यांमध्ये परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चंद्रकांत वारघडे यांनी याप्रकरणी वाघोली पोलीस स्टेशन, सायबर क्राईम विभाग, पंजाब नॅशनल बँक वाघोली शाखा, रिझर्व बँक दिल्ली आणि पंजाब नॅशनल बँक दिल्ली येथील मुख्य शाखेमध्ये तक्रार केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाघोली येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत वारघडे यांचे बचत खाते आहे.बँकेतून 27 नोव्हेंबर 2024 रोजी सोने तारण करून कर्ज प्रकरण केले होते. शनिवारी (ता. 07 डिसेंबर) आरटीजीएस द्वारे त्यांच्या पंजाब नॅशनल बँकेमध्ये ते पैसे ट्रान्सफर केले होते. सायबर गुन्हेगारांना याची माहिती मिळाली होती. मंगळवारी (ता. 10) चंद्रकांत वारघडे यांना पंजाब नॅशनल बँके मधून बोलतोय असे खोटे सांगून बोलण्यात गुंतविले, आणि तेथून पुढे फक्त दोन तासांमध्ये वेगवेगळ्या नावाने वेगवेगळे अकाउंट वर ठराविक वेळेने प्रत्येकी 5, 10 आणि 3 हजार रुपये प्रमाणे ट्रान्सफर करून 1 लाख 52 हजार रुपये गायब केले.
दरम्यान, याबाबत बोलताना वारघडे म्हणाले, “पंजाब नॅशनल बँकेने या संदर्भात ही सर्व जबाबदारी ग्राहकांची असून त्या संदर्भात बँक कुठलीही जबाबदारी घेण्यास तयार नाही. पंजाब नॅशनल बँकेच्या खातेदारांनी सावधगिरीने आपले व्यवहार करावे.
याबाबत बोलताना नॅशनल बँकेचे व्यवस्थापक तुषार केदार म्हणाले, ” ग्राहकांनीअनोळखी येणाऱ्या मेसेज अथवा फोन कॉल पासून सावधानता बाळगावी अनोळख्या व्यक्तीबरोबर जास्त संभाषण टाळावे. येणारे ओटीपी तसेच फोन यांच्याशी जास्त वेळ चर्चा करू नये. काय अडचण आल्यास थेट बँकेत जाऊन चौकशी करावी.