पुणे, ता. 25 : शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्या अनधिकृत जाहिरात फलक आणि पोस्टर लावणाऱ्या जाहिरातदारांविरोधात पुणे महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. एअरपोर्ट रोड, सिम्बायोसिस कॉलेज, म्हाडा कॉलनी आणि विमाननगर परिसरात विनापरवाना जाहिरात फलक लावल्याप्रकरणी आठ जाहिरातदारांविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पुणे महापालिकेच्या नगर रोड-वाघोली क्षेत्रीय कार्यालयाच्या परवाना व आकाशचिन्ह विभागाने नोव्हेंबर महिन्यात ही कारवाई केली. युथविले को-लिव्हिंग, निर्माण डेव्हलपर्स, मंगलमूर्ती वास्तू प्रा. लि., के. बी. लक्झरी पीजी, धरणी पीजी, श्रीराम पीजी, पीजी 1 बीएचके फॉर रेंट आणि श्री बालाजी पीजी या जाहिरातदारांचे फलक व पोस्टर सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आल्याचे निदर्शनास आले होते.
झाडांवर, सार्वजनिक भिंतींवर तसेच महापालिकेच्या विद्युत खांबांवर कोणतीही परवानगी न घेता जाहिराती लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे महापालिकेच्या पथकाने संबंधित फलक व पोस्टर हटविण्याची कारवाई केली.

याप्रकरणी परवाना निरीक्षक मनोज बिडकर यांनी 23 नोव्हेंबर रोजी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. महाराष्ट्र मालमत्ता विद्रूपीकरण प्रतिबंधक अधिनियम 1995 चे कलम 3 तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील कलम 244 व 245 नुसार संबंधित जाहिरातदारांविरोधात तक्रार करण्यात आली आहे.
दरम्यान, शहराचे विद्रूपीकरण रोखण्यासाठी महापालिकेने अनधिकृत जाहिरात फलकांविरोधातील कारवाई तीव्र केली असून, विनापरवाना जाहिराती लावणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.







