योगेश शेंडगे
शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील तळेगाव-न्हावरा रोडवर मालवाहू ट्रक उलटल्याची घटना घडली आहे. ही घटना माळवाडी येथील माऊली हॉटेल समोर असलेल्या वळणावर आज दुपार अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत ट्रकचालक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, मालाने भरलेला ट्रक दोन पलटी घेत पुन्हा सरळ झाला.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, न्हावरेहून तळेगावच्या दिशेने जाणारा भरधाव मालवाहू ट्रक क्र. (MH46BF0068) हा माळवाडी येथील माऊली हॉटेल समोर असलेल्या वळणावर पलटी झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रकच्या दोन पलट्या होऊन पुन्हा सरळ झाला.
अपघात इतका भीषण होता कि, ट्रकच्या निम्म्या भागाचा चक्काचूर झाला असून ट्रकचालक गंभीर जखमी झाला आहे. जखमी ट्रक चालकाला नागरिकांनी तत्परता दाखवत तातडीने ट्रकमधून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या घटनेत ट्रक आणि त्यामध्ये असलेल्या मालाचे मोठे नुकसान झाले आहे.
अपघाताचे सत्र सुरूच
तळेगाव-न्हावरा रस्त्यावर दररोज अपघाताचे सत्र सुरूच आहे. या रस्त्यावर 24 कि.मी च्या अंतरामध्ये एकही गतिरोधक नसल्याने वाहने अतिशय वेगाने चालतात. तसेच या रोडवर वळणे अधिक असल्याने चालकांना त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढतच आहे. दरम्यान, या रोडवर ठिकठिकाणी गतिरोधक बसवा, अशी मागणी नागरिक करत आहेत.