पुणे: दहीहंडी उत्सवाच्या जल्लोषाला यंदा काही ठिकाणी अपघातांचे गालबोट लागले. पुण्यात दहीहंडी फोडण्यासाठी बारामतीहून आलेल्या एका 22 वर्षीय तरुणाचा रस्ता अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. सासवड-दिवे घाट परिसरात शनिवारी रात्री हा अपघात घडला. या घटनेत आणखी दोन तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मृत तरुणाचे नाव गौरव राजेंद्र चव्हाण (वय 22, रा. आमराई, बारामती) असे आहे. दहीहंडी उत्सवासाठी गौरव आपल्या मित्रांसोबत दुचाकीवरून पुण्याच्या दिशेने निघाला होता. दिवे घाटातून जात असताना त्यांच्या दुचाकीला एसटी बसने धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, गौरवचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या अपघातात गौरवसोबत असलेले सागर कडाळे आणि ऋषीकेश खरात हे दोघेही जखमी झाले. त्यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या दोघांवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी गौरवचा मित्र ऋषीकेश खरात (वय 21, रा. बारामती) याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर फुरसुंगी पोलिसांनी एसटी बसचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.








