सांगली: वाळवा तालुक्यातील गोटखिंडी येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या निवासी अकादमीत तीन अल्पवयीन विद्यार्थिनींसोबत लैंगिक अत्याचार आणि विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अकादमीचा संस्थापक काशीनाथ रामचंद्र नांगरे याला आष्टा पोलिसांनी अटक केली आहे. त्याची पत्नी मनीषा काशीनाथ नांगरे हिच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले असून, ती सध्या फरार आहे.

पोलिसांत दाखल झालेल्या तक्रारीनुसार, 11 जून 2026 पासून हा प्रकार घडत असल्याचा आरोप आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील तीन अल्पवयीन मुली या अकादमीत निवासी पद्धतीने शिक्षण घेत होत्या. रात्रीच्या वेळी मुली झोपलेल्या असताना आरोपी संस्थापकाने त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

घडलेल्या प्रकाराची माहिती मुलींनी अकादमीतील शिक्षिका तसेच काशीनाथ नांगरे यांची पत्नी मनीषा नांगरे हिला दिली होती. मात्र, मदत करण्याऐवजी तिने मुलींना कोणालाही याबाबत सांगू नये, अन्यथा त्यांच्या शैक्षणिक भवितव्याचे नुकसान करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

या प्रकारामुळे घाबरलेल्या विद्यार्थिनींनी अखेर धाडस करून पालकांना सर्व माहिती दिली. त्यानंतर पालकांनी आष्टा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह पोक्सो कायद्यानुसार काशीनाथ आणि मनीषा नांगरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी काशीनाथ नांगरे याला ताब्यात घेऊन अटक केली.






