दीपक खिलारे
इंदापूर : फुड इंडस्ट्री क्षेत्रात विद्यार्थ्यांना व्यवसायाच्या नविन संधी निर्माण होत असल्याचे मत निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे विद्यार्थी विकास मंडळ आणि इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर महाविद्यालयात फूड फेस्टिवलचे शुक्रवारी (दि.3) आयोजन करण्यात आले होते. निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांच्या हस्ते या फेस्टिवलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राजवर्धन पाटील यांनी विद्यार्थयांना मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर इतर कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे. तसेच या आधुनिक युगात पर्यटन व्यवसायाचा विकास व विस्तार वेगाने होत आहे. शालेय जीवनात अशा प्रकारच्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होतो. त्यामुळे अशा उपक्रमांमध्ये विद्यार्थ्याबरोबर, शिक्षक आणि पालकांचा देखील सहभाग असणे आवश्यक आहे, असा सल्ला राजवर्धन पाटील यांनी यावेळी दिला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे म्हणाले, छोट्या व्यवसायातून उद्योगाच्या प्रेरणा विकसित होतात. व विद्यार्थ्यांना व्यावसायिक अनुभवही मिळतो.
या फूड फेस्टिवलमध्ये ५९ स्टॉलधारक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून जवळपास ८० ते ९० हजार रुपयांची उलाढाल झाली असल्याची माहिती या उपक्रमाचे आयोजक विद्यार्थी विकास मंडळाचे समन्वयक डॉ. तानाजी कसबे यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडासंचालक डॉ. भरत भुजबळ यांनी केले तर आभार डॉ. शिवाजी वीर यांनी मानले.