उरुळी कांचन, (पुणे) : नातेवाईकाच्या नवीन घराच्या पूजेला गेलेल्या रिक्षाचालकाच्या पत्राच्या शेडचे लोखंडी गज वाकवून अज्ञात चोरट्याने कपाटातील 72 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी महिला रेष्मा अल्लाउद्दीन कायमे (वय 39, व्यवसाय-मजुरी, रा. नायगाव, मार्गवस्ती, शिवरोड, ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रेष्मा कायमे या आपल्या पती, मुलगा आणि मुलीसह नायगाव येथील मार्गवस्ती परिसरात राहतात. त्यांचे पती अल्लाउद्दीन हे रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. रविवारी (ता. 28) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घरातील सर्वजण कुंजीरवाडी येथे राहणारे त्यांचे पाहुणे जावेद अन्सारी यांच्याकडे नवीन घराची पूजा असल्याने तिकडे गेले होते.
नातेवाईकांकडील कार्यक्रम आटोपून रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरी परतले. त्यांनी पत्राच्या शेडचे कुलूप उघडून आत प्रवेश केला असता, घरातील कपाटाचे दार उघडे आणि कपडे अस्ताव्यस्त पडलेले दिसले. यामुळे रेष्मा यांनी कपाटात जाऊन पाहिले असता, त्यांचे व मुलगी सिमरन हिचे कपाटात ठेवलेले दागिने जागेवर नव्हते.
दरम्यान, घराची पाहणी केली असता, पत्राच्या शेडला हवा येण्यासाठी ठेवलेल्या खिडकीच्या जाळीचे लोखंडी गज अज्ञात चोरट्याने वाकवल्याचे दिसून आले. त्या वाकवलेल्या गजांच्या फटीतूनच अज्ञात चोरट्याने घरात कडक प्रवेश करून घरफोडी केल्याची खात्री कुटुंबाला झाली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार सचिन जगताप करीत आहेत.







