उरुळी कांचन, (पुणे) : लक्ष्मीपूजन करून कुटुंबीय गाढ झोपेत असताना अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने, रोकड आणि नुकतीच खरेदी केलेली नवीन होंडा अॅक्टिव्हा मोपेड असा एकूण 2 लाख 65 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना अष्टापूर (ता. हवेली) येथील हनुमानवाडी परिसरात रविवारी (ता. 8) ते सोमवारी (ता. 09) सकाळदरम्यान घडली. विशेष म्हणजे, चोरट्यांनी घरातील मारुती सुझुकी स्विफ्ट कारची चावीही लंपास केली आहे.

याप्रकरणी महावीर कुंडलिक कोतवाल (वय-42, रा. अष्टापूर, हनुमानवाडी, ता. हवेली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महावीर कोतवाल हे वाहनचालक असून, पत्नी आणि दोन मुलांसह अष्टापूर येथे राहतात. रविवारी रात्री लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने कोतवाल यांनी हडपसर येथील भंडारी ऑटो लाईन्स शोरूममधून स्वतःच्या नावावर नवीन होंडा अॅक्टिव्हा मोपेड खरेदी केली होती. घरी आल्यानंतर कुटुंबीयांसह त्यांनी नवीन वाहनाचे पूजन केले. त्यानंतर रात्री जेवण करून सर्वजण झोपले.

दुसऱ्या दिवशी सकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास कुटुंबीयांना जाग आली असता घराचा मुख्य दरवाजा उघडा दिसला. दरवाजाशेजारील स्लायडिंग खिडकीची काच सरकवलेली होती. तसेच घरातील कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि लक्ष्मीपूजनासाठी देवासमोर ठेवलेली रोकड गायब होती.

नुकतीच खरेदी केलेली नवीन अॅक्टिव्हाही पार्क केलेल्या ठिकाणी दिसली नाही. तिच्यासह घरात ठेवलेली अॅक्टिव्हाची चावी आणि स्विफ्ट कारची चावीही चोरीला गेल्याचे समोर आले. चोरट्यांनी खिडकीची काच सरकवून आत हात घातला आणि मुख्य दरवाजाची कडी उघडून घरात प्रवेश केल्याचा संशय कोतवाल यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, या चोरीमध्ये सुमारे 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील टॉप्स व वेल, 50 हजार रुपयांची रोकड, एक लाख 15 हजार रुपये किमतीची नवीन होंडा अॅक्टिव्हा मोपेड तसेच स्विफ्ट कारची चावी असा एकूण 2 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडी व चोरीची तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक गजानन कागणे पुढील तपास करीत आहेत.







