डॉ. अशोक बालगुडे

पुणे : फटाके अंगावर उडत असल्याने ते बाजूला जाऊन उडवा, असे सांगितल्याचा राग मनात धरून टोळक्याने केलेल्या बेदम मारहाणीत 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. अमन समीर शेख असे मृत तरुणाचे नाव आहे. विमाननगरमधील कायरा रस्त्यावरील रोझ गार्डन सोसायटीसमोर 8 नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. गुरुवारी (12 नोव्हेंबर) उपचार सुरू असताना अमनचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमन आणि त्याचे मित्र फटाके उडवत असताना जवळच फटाके उडवणाऱ्या दुसऱ्या गटातील काही फटाके त्यांच्या अंगावर आले. त्यामुळे अमनने फटाके बाजूला उडवण्यास सांगितले. यावरून दोन्ही गटांत वाद झाला. आरोपींनी अमनला शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर रस्त्याच्या कडेला पडलेल्या लाकडी बांबूने त्याच्या डोक्यावर, पाठीवर आणि शरीरावर वार केले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला.

मित्रांनी अमनला प्रथम खासगी रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला ससून रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करूनही त्याचे प्राण वाचू शकले नाहीत.

याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी सुरुवातीला 11 जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. त्यापैकी चौघांना अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. अमनचा मृत्यू झाल्यानंतर सहा आरोपींविरुद्ध खुनाचे कलम वाढविण्यात आले आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
दिवाळीच्या आनंदोत्सवात किरकोळ वादातून तरुणाचा जीव गेल्याने शहरातील कायदा-सुव्यवस्था आणि तरुणांमधील वाढती हिंसक प्रवृत्ती पुन्हा चर्चेत आली आहे.






