जालना : नाशिकमधील अशोक खरात प्रकरणानंतर राज्यात अंधश्रद्धा आणि भोंदूबाबांविरोधातील कारवाईचा मुद्दा चर्चेत असतानाच जालना जिल्ह्यातून असाच एक प्रकार समोर आला आहे. मंठा तालुक्यातील पोखरी गावात गुप्तधन मिळवण्याच्या आमिषातून अघोरी पूजा सुरू असल्याचे उघड झाले. या प्रकरणी जालना पोलिसांनी एका मांत्रिकासह नऊ जणांना अटक केली आहे. घटनास्थळावरून पूजेचे साहित्य, एक कार आणि इतर संशयास्पद वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मंठा तालुक्यातील पोखरी गावात शेतात सोन्याचे सात हांडे पुरलेले असल्याची बतावणी करण्यात आली होती. हे गुप्तधन मिळवण्यासाठी बुधवारी रात्री नऊ जणांनी गावातील एका शेतात पूजा मांडली होती. रात्रीच्या अंधारात हा विधी सुरू असताना गावकऱ्यांना याची माहिती मिळाली.
गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत हा प्रकार थांबवला आणि पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून एका मांत्रिकासह नऊ जणांना ताब्यात घेत अटक केली.

पोलिसांनी आरोपींकडून लिंबू, नारळ, बदाम, सुपारी यांसह पूजेसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले आहे. याशिवाय घटनास्थळावरून एक कार आणि इतर संशयास्पद वस्तूही ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

या प्रकरणी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती परतूरचे पोलीस उपअधीक्षक रोहित कमलदाणे यांनी दिली.
गुप्तधनाच्या आमिषातून अघोरी विधी केल्याचा हा प्रकार समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली अशा प्रकारांना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.







