उरुळी कांचन : शिरूर-हवेली मतदार संघातील उरुळी कांचन गावात बोगस मतदार नोंदणी झाली आहे. याबाबतीत शोध घेऊन ती नावे वगळण्यात यावी, अशी आग्रही मागणी शिवसेनेचे पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अलंकार कांचन यांनी पुणे जिल्ह्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पूलकुंडवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत नवीन मतदार नाव नोंदणीचे काम सुरू आहे. मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज दाखल करत असताना बाह्य ठिकाणावरून मतदार स्थलांतराचेही अर्ज भरून घेतले जात असल्याचे समजते. या अर्जात बोगसगिरी होण्याची शक्यता जास्त आहे. उरुळी कांचन मध्ये काही प्लॉट धारकांनी प्लॉट खरेदी केलेल्या व्यक्तींची नावे मतदार नाव नोंदणीला लावली आहेत. मतदार यादीला नावे लावलेली व्यक्ती उरुळी कांचन मधील रहिवाशी नसून, स्थानिक देखील नाहीत. तरी सदर नावे बोगस असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे छाननी करून ती नावे वगळण्यात यावी.
निवडणुकीची भीती असणारे काही संभाव्य उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी पुन्हा बोगस मतदार नोंदणी करून घेत आहेत. हा अक्षम्य गुन्हा आहे. त्याचे परिणाम प्रामाणिक काम करणाऱ्या मतदारांना आणि इतर उमेदवारांना भोगावा लागणारा आहे. बोगस आधार कार्ड बनवून चुकीच्या पद्धतीने मतदार नोंदणी होत असल्याचा आरोपही कांचन यांनी यावेळी केला आहे.
दरम्यान, निवेदन दिल्यानंतर पुणे जिल्ह्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पूलकुंडवार म्हणाले की, सदर घटनेची माहिती घेऊन संबंधित विभागाला कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती अलंकार कांचन यांनी दिली. यावेळी शिवसेना जिल्हा संघटक निलेश काळभोर, सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर उपस्थित होते.
याबाबत बोलताना जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अलंकार कांचन म्हणाले, ” उरुळी कांचन येथील काही प्लॉटिंग व्यावसायिक व गावातील लोकप्रतिनिधी ग्रामपंचायतची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन बोगस नावे लावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे उरुळी कांचन परिसरात मागील अनेक दिवसांपासून रहिवासी असलेला खरा मतदार याच्या मताची किंमत ही कमी होत चालली आहे. अशी बोगस नावे लावून कोण निवडून येणार असेल तर जो खरा स्थानिक आहे त्याची कामे कोण करणार हा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे शोध घेऊन ती नावे वगळण्यात यावी अशी मागणी केली आहे.