राहुलकुमार अवचट

यवत: सार्वजनिक ठिकाणी डी.जे. वाजवून उपद्रव करणाऱ्यांवर यवत पोलिसांनी धडक कारवाई केली असून, कोणत्याही प्रकारे डी.जे. अथवा लेझर लाईटचा वापर केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पाटस गावच्या हद्दीतील नागेश्वर मंदिरासमोर, सार्वजनिक ठिकाणी कोणतीही परवानगी न घेता वाहन क्रमांक MH 04 S0364 मध्ये अतिशय मोठ्या आवाजात डी.जे. लावून गाणी वाजवत सार्वजनिक ठिकाणी नाच सुरू ठेवला होता.

यावेळी पोलिस विभागाच्या कर्तव्यदक्ष पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वारंवार सूचना देऊनही मोठ्या आवाजात डी.जे. सुरू ठेवण्यात आला. त्यामुळे सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेचा भंग केल्याप्रकरणी पोलिस हवालदार राजकुमार कोकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अविनाश बाबुराव जाधव (रा. कानगाव, ता. दौंड), गौरव बाळासो माखर व अभिजीत हनुमंत चव्हाण (दोघेही रा. पाटस, ता. दौंड) यांच्या विरोधात यवत पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच डी.जे. ध्वनीक्षेपकासह संबंधित वाहन जप्त करण्यात आले आहे. याबाबत अधिक तपास पोलिस हवालदार बंडगर हे करत आहेत.
पुणे ग्रामीण पोलिस दलाकडून नागरिकांना कायदेशीर इशारा व आवाहन
सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था राखणे हे पोलिस प्रशासनाचे प्राधान्य आहे. पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या हद्दीत कोणत्याही व्यक्तीने, मंडळाने अथवा आयोजकांनी कोणत्याही प्रकारे डी.जे. (DJ) अथवा लेझर लाईटचा (Laser Light) वापर केल्यास अशाच प्रकारे कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
डी.जे.चा भीषण आवाज आणि तीव्र लेझर लाईट्समुळे वृद्ध, आजारी व्यक्ती, लहान मुले आणि सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर तसेच डोळ्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतात. सर्व नागरिक, उत्सव मंडळे आणि डी.जे. चालकांनी कायद्याचे नियम पाळावेत व पोलिसांना सहकार्य करावे.
संतोष तासगावकर, पोलिस निरीक्षक, यवत पोलिस स्टेशन







