पुणे : दिवंगत चित्रपट अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियन हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने आता अधिकृतपणे गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दिशाचे वडील सतीश सालियन यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. या दाखल केलेल्या FIR मध्ये शिवसेनेचे (UBT) आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह काही प्रमुख व्यक्तींच्या भूमिक्याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

या संपूर्ण घडामोडींवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. हा ठाकरे कुटुंबाची प्रतिमा मलिन करण्यासाठी रचलेला एक राजकीय कट असल्याचा आरोप त्यांनी केला.संजय राऊत म्हणाले की, दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाशी आदित्य ठाकरे यांचा दुरान्वयेही संबंध नाही. त्यांच्याविरोधात कोणताही सबळ पुरावा नसताना केवळ राजकीय सूड उगवण्यासाठी हे प्रकरण जुने असूनही पुन्हा उकरून काढले जात आहे.

सत्ताधारी पक्षातील दोन बड्या नेत्यांच्या दबावाखाली ही कारवाई केली जात आहे. 16 पानांच्या FIR मधील केवळ विशिष्ट भागच ठरवून बाहेर कसा येतो, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. ठाकरे कुटुंबाला सातत्याने लक्ष्य केले जात असून हा प्रकारही त्याच राजकीय बदनामीचा एक भाग असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. उच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत CBI चौकशीचे निर्देश दिल्यानंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मात्र, विरोधकांनी यावर जोरदार टीका केली असून, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सत्ताधाऱ्यांकडून केला जात असल्याचा पुनरुच्चार केला आहे. या ताज्या कारवाईमुळे राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.







