लातूर: शैक्षणिक क्षेत्रातील चर्चेत असलेल्या लातूर शहरात एका शिक्षण संस्थाचालकाच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. संजीव चंद्रभानू सोनवणे यांनी शहरातील पद्मानगर परिसरातील त्यांच्या राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे. ते 62 वर्षांचे होते.

सोनवणे यांच्या मृत्यूची घटना समोर आल्यानंतर परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून पेपरफुटीच्या प्रकरणांमुळे लातूर चर्चेत असताना आता या घटनेने शहराच्या शैक्षणिक क्षेत्रातही चिंता व्यक्त केली जात आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, संजीव सोनवणे हे घरी एकटे राहत होते. त्यांचे कुटुंबीय विदेशात राहत असल्याची माहिती आहे. सोनवणे यांना विविध आजारांचा त्रास असल्याचेही समोर आले असून, त्यातून आलेल्या मानसिक तणावामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे.

दरम्यान, जीवन संपवण्यापूर्वी सोनवणे यांनी एक चिठ्ठी लिहिल्याचे समोर आले आहे. या चिठ्ठीत आपल्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असे त्यांनी नमूद केल्याची माहिती आहे. तसेच या प्रकरणाचा तपास करू नये, असे आवाहनही त्यांनी पोलिसांना केल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र, या चिठ्ठीतील मजकूर आणि घटनास्थळावरील परिस्थिती लक्षात घेता पोलिसांकडून संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. सोनवणे यांनी एकटेपणा, आजारपण किंवा इतर कोणत्या कारणामुळे हे पाऊल उचलले, याचा तपास केला जाणार आहे.
या घटनेमागे आत्महत्येव्यतिरिक्त कोणतीही दुसरी शक्यता आहे का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. त्यामुळे तपास पूर्ण झाल्यानंतरच मृत्यूमागचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.







