मावळ : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मावळात भाजपला धक्क्यातून धक्के मिळत आहेत. अशातच भाजपला अजून एक मोठा धक्का बसला आहे. प्रदेश सहकार आघाडी सहसंयोजक पदावर असलेले बाळासाहेब नेवाळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नेवाळे यांच्या मागे मोठा शेतकरी वर्ग आहे. त्यामुळे भाजपला याचा मोठा फटका बसू शकतो असं बोललं जात आहे.
मावळामध्ये भाजपला प्रदेश सहकार आघाडी सहसंयोजक पदी असलेले बाळासाहेब नेवाळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने मोठा धक्का बसला आहे. नेवाळे यांनी भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. मावळ तालुक्यात भाजप नेते मंडळी यांचे राजीनामा नाट्य सुरूच आहे. मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांना उमेदवारी जाहीर होताच तालुक्यात भाजपच्या गोटात असंतोष पसरल्याचे चित्र होते. त्यामुळे तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणूक प्रचारावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतीत एका जाहीर सभेत नेवाळे यांनी भाजप पक्षात जाहीर प्रवेश केल होता. त्यानंतर भाजपने राज्य सहकार आघाडी सहसंयोजक पदी नियुक्त केलं होतं. मात्र तालुक्यातील राजकीय समीकरण बदलत असताना नेवाळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बाळासाहेब नेवाळे हे दूध संघाचे अध्यक्ष देखील राहिले आहेत. शेतकरी वर्ग त्यांच्या मागे मोठ्या प्रमाणात आहे.